तब्बल ४४३ जप्त मालमत्तांचा सोमवारी लिलाव होणार

तब्बल ४४३ जप्त मालमत्तांचा सोमवारी लिलाव होणार
Published on

पिंपरी, ता. २८ ः थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत.
त्यानुसार आता थकबाकीदार ४४३ मालमत्ता सोमवारी (ता. ३१) लिलाव काढण्यात येणार आहेत. ज्या मालमत्तांसाठी खरेदीदार उपलब्ध होणार नाहीत, अशा मालमत्ता एक रुपयाची नाममात्र बोली बोलून खरेदी करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने कळविले आहे.
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने सक्तीने कार्यवाही सुरू केलेली आहे. बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र प्रकारातील १ हजार ५७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्यापैकी ५६७ थकबाकीदार मालमत्ताधारकांनी ११ कोटी एवढ्या कराचा भरणा केला आहे. त्यावर संबंधित मालमत्ता सीलमुक्त करुन मिळकतधारकाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित ४९० पैकी ४७ मालमत्ताधारकांनी सुद्धा एक कोटींहून अधिकचा कर नुकताच जमा केला आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या उर्वरित ४४३ मालमत्तांचा ३१ मार्च रोजी लिलाव करण्यात येणार आहे.
महापालिकेने २० मार्च रोजी थकबाकीदार ४९० बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांच्या लिलावासाठी जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत १२ मालमत्ताधारकांनी ६३ लाखांचा भरणा केला असून २४ मालमत्ताधारकांनी ३८ लाखांचा अशंत: भरणा केला आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक रकमेचा भरणा करणाऱ्या ११ मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून मुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ४९० मालमत्ताधारकापैकी ४७ मालमत्ताधारकांकडून एकूण १ कोटींहून अधिक कराचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या ४४३ मालमत्तांचा ३१ मार्च रोजी लिलाव करण्यात येणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक रक्कम असलेल्या मालमत्ताधारकांनी एकूण थकीत कराच्या ५० टक्के कराचा भरणा केल्यास त्यांची मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येऊन मालमत्ता सीलमुक्त करण्यात येणार आहे, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. मालमत्ता लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या मालमत्तांसाठी खरेदीदार उपलब्ध होणार नाहीत, अशा मालमत्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत एक रुपयाची नाममात्र बोली बोलून खरेदी करण्यात येणार आहे, असे कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तब्बल १५ कोटींचा कर थकीत
महापालिकेने एकूण १ हजार ५७ बिगरनिवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि मिश्र मालमत्ता जप्त केल्या. त्यामध्ये साधारणत: २६ कोटी रकमेचा मालमत्ता कर प्रलंबित होता. त्यापैकी ५६७ खातेदारांनी ११ कोटी रक्कम भरल्यामुळे त्यांच्या मालमत्ता मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आल्या. अद्यापही ४४३ थकबाकीदारांकडून जवळपास १५ कोटी रक्कम येणे असून त्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. तसेच सध्या ६९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असणाऱ्या बिगरनिवासी, औद्योगिक आणि मिश्र मालमत्तांच्या जप्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचा ३१ मार्चपूर्वीच लिलाव केला जाणार आहे.


एकूण ५६७ खातेदारांकडून जवळपास ११ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. अद्यापही ४४३ खातेदारांकडून जवळपास १५ कोटी इतकी रक्कम वसुली प्रलंबित आहे. महापालिकेने ‘थकबाकीमुक्त महापालिका’ असा निश्चय केला आहे. त्यासाठी थकबाकीदार मालमत्ताधारकांनी कर ३१ मार्च पूर्वी जमा करावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com