माय फ्रेंड श्रीगणेशा ः दोन

माय फ्रेंड श्रीगणेशा ः दोन

Published on

माय फ्रेंड श्रीगणेशा ः दोन ः पीतांबर लोहार
--
विघ्नें वारी

जय जय रामकृष्णहरि...। भजन झाले. त्यानंतर वीणेकऱ्यांनी वीणेच्या झन्कारावर पखवाजाचे बोल पखवाज वादकाकडून लावून घेतले. स्वराचा आलाप घेत, संत तुकाराम महाराज यांचा पंढरीच्या पांडुरंगाचे अर्थात विठ्ठलाचे वर्णन करणारा,
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥
तुळसी हार गळां कांसे पीताम्बर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ।।
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥
मंगलचरणातील अभंग सादर केला. विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन या अभंगामध्ये केले आहे. विटेवर उभे असलेले श्रीविठ्ठलाचे रूप किती सुंदर आहे. कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. पीतांबर नेसून युगानुयुगे उभा विठ्ठलाचे वर्णन संत तुकाराम महाराज यांनी अभंगामध्ये केले आहे. कीर्तनकार महाराज कीर्तनाच्या व्यासपीठकडे येताना दिसताच वीणेकरी साधक यांनी ‘विठोबा रखुमाईऽ जय जय विठोबा रखुमाई।’ऽऽ हे नामस्मरण सुरू केले. त्यांच्या पाठोपाठ टाळकरीही ‘विठोबा रखुमाई’ म्हणत होते. नामस्मरणाचा स्वर उंचीवर गेला. कीर्तनकार महाराज आले. धोतर आणि सदरा घातलेला. डोक्याला फेटा बांधलेला. कपाळी बुका लावलेला. गळ्यात तुळशीची माळ. खांद्यावर उपरणे घेतलेले. वीणेकरी ज्या घोंगडीवर उभे राहून नामस्मरण म्हणत होते, तिथे कीर्तनकार महाराज आले. ती घोंगडी म्हणजे महर्षी नारदमुणींचे अधिष्ठान म्हणून ओळखली जाते. कीर्तनकार महाराज यांनी वीणेकऱ्यांच्या पायाला स्पर्श करत दर्शन घेतले. त्यानंतर उभे राहून वीणेकरी साधकाने कीर्तनकार महाराजांच्या हाती वीणा दिला. त्यानंतर साधकाने त्यांच्या पायाला स्पर्श करत दर्शन घेतले. त्यावेळी ‘एकामेका लागतील पायी रे’ या वारकरी सांप्रदायाच्या महतीची अनुभूती आली. महाराजांनी वीणा हाती घेतला. महर्षी नारदांचे अधिष्ठान असलेल्या घोंगडीवर उभे राहिले. समोर ध्वनिक्षेपक लावलेला होता. त्यावर ‘हरि’ शब्द उच्चारला. वीणेचा झन्कार काढला. पखवाज वादकाला काही सूचना केल्या आणि स्वर लावत ‘हरि, जय जय रामकृष्णहरि...।’ नामस्मरण सुरू केले. त्यानंतर पंढरीच्या विठ्ठलाचे वर्णन करणारा संत ज्ञानेश्वर माउली यांचा रुपाचा अभंग सुरू केला.
रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
ह्मणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवर ॥
रुपाच्या अभंगाची आळवणी केल्यानंतर महाराजांनी निरुपणासाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतला. त्यामध्ये लाडक्या गणरायाचे वर्णन केलेले आहे. तो अभंग होता,
धरोनियां फरश करी ।
भक्तजनाचीं विघ्नें वारी ।।
ऐसा गजानन महाराजा ।
त्याचें चरणीं हालो लागो माझा ।।
सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला ।
तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदिर असे जयाचें वहन ।
माथां जडितमुगुट पूर्ण ।।
नागयज्ञोपवीत रुळे ।
शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ।।
भावमोदक हराभरी ।
तुका भावें हे पूजा करी ।।
निरुपणासाठी घेतलेल्या अभंगाचे गायन झाल्यानंतर परमेश्वराला नमन केले. त्यासाठी संत तुकाराम महाराज यांचा नमनाचा अभंग गायला सुरुवात केली.
पांडुरंगा करू प्रथम नमन ।
दुसरे चरण संतांचिया ॥


यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु ।
बाबाजी सद्‍गुरुदास तुका ॥
काय माझी वाणी मानेल संतांसी ।
रंजवू चित्तासी आपुलिया ॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद ।
आवडी गोविंद गावयासी ॥
नमनाचा अभंग झाल्यानंतर कीर्तनकार महाराजांनी निरुपणासाठी घेतलेल्या ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।।...’ या अभंगाची पुन्हा उजळणी केली. ‘विठोबा रखुमाई’ भजन झाले. टाळकऱ्यांसमवेत साथीला उभे असलेल्या दोन गायकांना खुणेनेच सूचित केले. त्यानंतर त्यांनी शास्रीय गायन पद्धतीने ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।।’ या अभंगाची आळवणी केली. त्यानंतर महाराजांच्या पाया पडून आपापल्या जागेवर उभे राहिले. ‘विठ्ठल-विठ्ठल’ भजन म्हटले. कीर्तनकारांनी गळ्यातील उपरणे कंबरेभोवती बांधले. आणि कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘‘आजच्या या शुभदिनी, श्रीगणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने जगद्‍गुरू, जगद्‍वंदनीय देहू येथील संत तुकाराम महाराज यांचा गणपतीचे वर्णन करणारा पाच चरणांचा ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।।’ अभंग कीर्तनरुपी सेवेकरता निवडलेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की, धरोनियां म्हणजे धरून किंवा हाती घेऊन. फरश म्हणजे फरशी किंवा तलवारीसारखे शस्त्र. करी म्हणजे हात. भक्तजनाचीं म्हणजे भक्तांची, देवावर श्रद्धा असलेल्या भाविकांची. विघ्नें म्हणजे अडचणी, संकटे किंवा दुःख. वारी म्हणजे दूर करणे किंवा त्यांचे निवारण करणे.’’
‘विठ्ठलऽ विठ्ठलऽ’ नामस्मरण झाले.
कीर्तनकार महाराज पुन्हा बोलू लागले, ‘‘संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘धरोनियां फरश करी। भक्तजनाचीं विघ्नें वारी।।’ म्हणजेच ज्याच्या हातात फरशी किंवा तलवार आहे. ती घेऊन भक्तांच्या अडचणी, विघ्ने दूर करतो, असा तो देव म्हणजे गजानन आहे. ज्याला शमीची पाने व शेंदूर प्रिय आहे. ज्याला दुर्वांचा तुरा शोभून दिसतो. ज्याचे वाहन उंदीर आहे. ज्याचा माथ्यावर म्हणजे डोक्यावर रत्नजडित असा मुकुट आहे. ज्याने नागाचे यज्ञोपवित म्हणजे जानवे घातले आहे. ज्याने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. अशा देवतेचे पूजन करतो आहे.’’
‘विठ्ठलऽ विठ्ठलऽऽ’ पुन्हा नामस्मरण झाले.
संत किंवा देव म्हणजे गणपती किंवा विठ्ठल आपल्या भक्तांच्या अडचणी, दुःख आणि संकटे दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. जणू हातात शस्त्र घेऊन तो भक्तांचे रक्षण करत आहे, असा अर्थ जगद्‍गुरू संत तुकोबारायांना येथे अभिप्रेत असावा, असे सांगून कीर्तनकार महाराजांनी ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल’ नामस्मरण सुरू केले. त्यांच्या सुरात सूर मिसळत मागे व बाजूला साथीला उभे असलेले टाळकरी भाविकही ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत भजनात रमले...!
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com