मानसिक आरोग्य दिन

मानसिक आरोग्य दिन

Published on

जागतिक मानसिक आरोग्य दिन (प्रासंगिक)


तुमच्या मनाची काळजी घ्या, तीही मनापासून...

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा जागतिक मानसिक आरोग्य दिन यंदा ‘सेवा उपलब्धता : आपत्ती आणि संकटातील मानसिक आरोग्य’ या विषयाभोवती केंद्रित आहे. त्याचा खरा संदेश म्हणजे आपल्या मनाची काळजी तितक्याच मनापासून घ्या, जितकी शरीराची घेता. भावना लपवून नव्हे; तर त्या मोकळेपणाने व्यक्त करून उपचार सुरू होतात. एकमेकांशी बोला, शेअर करा आणि गरज वाटल्यास मदतीसाठी पुढे या. कारण, मानसिक आरोग्य ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
- डॉ. रोहन जहागीरदार, तज्ज्ञ, एमबीबीएस, एमडी, मनोविकारशास्त्र
----------------------
आ जची शहरी जीवनशैली ही जितकी वेगवान आणि संधींनी भरलेली आहे, तितकीच ती तणाव, मानसिक थकवा आणि सामाजिक एकटेपणाही निर्माण करणारी ठरली आहे. नेहमी ऑनलाइन राहण्याचा दबाव, विश्रांतीचा अभाव आणि प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे लोक चिडचिड, झोपेचे विकार, अतिविचार यासारख्या मानसिक समस्या अधिक प्रमाणात अनुभवत आहेत. यावर उपाय म्हणजे आपल्या दैनंदिन सवयींमध्ये साधेपण प्रभावी बदल. नियमित झोप, स्क्रीनपासून काही वेळ दूर राहणे, ध्यान किंवा चालण्यासारख्या सवयी. हे सगळे मनाला स्थैर्य देतात. दिवसातून फक्त २० मिनिटे स्वतःसाठी काढल्यासही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
तंत्रज्ञानाचा मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतो. सोशल मीडियाचा अतिरेक आत्मसन्मानावर परिणाम करतो. परंतु; याच डिजिटल माध्यमातून ऑनलाइन काउन्सलिंग, ध्यान अ‍ॅप्स आणि ‘एआय’ आधारित साधनांमुळे अनेकांना वेळेवर मदत मिळते आहे. मात्र, ‘एआय’ केवळ निदानात मदत करू शकते. थेरपी ही केवळ अल्गोरिदमवर नाही; तर समजून घेणाऱ्या माणसाच्या संवादातूनच प्रभावी ठरते.
कार्यस्थळी मानसिक तणाव आणि ‘बर्नआउट’ वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि काम यातील सीमारेषा पुसट होणे. त्यामुळे संस्थांनी लवचिक वेळापत्रक, समुपदेशन सेवा आणि मनोबल वाढविणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात कर्मचारी अधिक समाधानी असतात.
युवकांमध्येही मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढताना दिसत आहेत. करिअरचा दबाव, सोशल मीडियावरील तुलना, स्पर्धात्मक वातावरण आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे अनेक युवक चिंता, एकटेपणा आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचा सामना करत आहेत. ऑनलाइन जोडलेले असूनही भावनिक आधाराचा अभाव जाणवतो. पालकांनी यामध्ये मोलाची भूमिका पार पाडावी लागते. मुलांना ऐकावे, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि संवादासाठी मोकळे वातावरण तयार करावे.
आहार आणि जीवनशैलीही मन:स्वास्थ्यावर प्रभाव टाकते. संतुलित आहार, पुरेशी झोप, पाणी आणि नियमित व्यायाम यामुळे मेंदूतील एंडॉर्फिन्स स्रवतात. हे नैसर्गिक ‘हॅपी हार्मोन्स’ असून ते मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

काय करायला हवे?
- मुलांचे ऐका, पण समजावून सांगा
- मुलांशी खुलेपणाने बोला
- स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवा
- भावनिक शिकवण द्या
- मुलांना ‘परफेक्ट पालक’ नव्हे; ‘उपलब्ध पालक’ हवेत
- फळे, भाज्या, ओमेगा-३ फॅट्सयुक्त आहार मेंदूसाठी उपयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com