कोंडीमुक्त चाकणसाठी ‘पीएमआरडीए’वर धडक
पिंपरी, ता. १० : ‘‘चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासह इतर पायाभूत सुविधांची कामे करत असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सांगत आहे. शेकडो, हजारो कोटींची कामे सुरू असल्याचा दावा केला जातो. तरीही वाहतूक कोंडी आणि इतर समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आता आश्वासन नको, तर कामे दाखवा,’’ असा पवित्रा घेत ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’ने गुरुवारी (ता.९) आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’ कार्यालयावर मोर्चा काढला.
‘पीएमआरडीए’च्या कारभाराविरोधात नागरिक, लोकप्रतिनीधींनी आक्रमक भूमिका घेत या मोर्चावेळी समस्यांचा पाढाच वाचला. प्रामुख्याने चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि एमआयडीसी परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मोर्चात खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह उद्योजक, कामगार आणि चाकण परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ला येथून सकाळी साडेनऊच्या सुमारास मोर्चा सुरू झाला. आंदोलक विविध वाहनांनी तळेगाव चौक, आळंदी फाटा, मोशीतील धर्मवीर स्मारक चौकमार्गे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुमारे साडेबाराच्या सुमारास दाखल झाले. तेथून आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’ मुख्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा आणि प्रश्नांचे फलक घेऊन आंदोलक दीडच्या सुमारास ‘पीएमआरडीए’वर धडकले. पोलिसांनी कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग केल्याने नागरिक तेथेच थांबले. यावेळी खासदार डॉ. कोल्हे, नागरिक आणि पोलिस यांच्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, प्रशासनाने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविल्याने आंदोलक शांत झाले, मात्र बैठक होईपर्यंत त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.
चर्चेवेळी प्रशासनाने सध्या सुरू असलेली आणि भविष्यात होणाऱ्या विकासकामांची माहिती देत ती पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास आंदोलन स्थगित झाले.
हा लढा नागरिकांनी उभारलेला आहे. याला पाठिंबा देणे माझे कर्तव्य आहे. ‘पीएमआरडीए’ कार्यालयातील बैठकीत चाकणमधील समस्यांबाबत चर्चा झाली. काही विकासकामे दोन महिन्यांत सुरू करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
- अमोल कोल्हे, खासदार, शिरूर
चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते राजगुरूनगर मार्गाच्या निविदा प्रक्रियेबाबत अजूनही साशंकता आहे. तळेगाव-चाकण उन्नत मार्ग, चाकण- शिक्रापूर महामार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ती लवकर करून कामे सुरू करावीत. चाकण परिसरातील दोन उड्डाणपूल पाडून नागरिकांना कोंडीमुक्त करावे.
- बाबाजी काळे, आमदार, खेड
नाशिक फाटा ते राजगुरुनगर महामार्गाची निविदा २०१७ मध्ये काढली होती. त्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका, मेट्रो आणि काही नेत्यांनी खो घातला. हे काम अजूनही रखडलेले आहे. आज ‘पीएमआरडीए’ आयुक्तांनी विकास कामांबाबत समाधानकारक सादरीकरण केले आहे. ही कामे लवकर सुरू करुन नागरिकांना दिलासा द्यावा.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार
चाकण परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाली. विविध कामांना लवकर सुरुवात होईल, असे आश्वासन ‘पीएमआरडीए’ आयुक्तांनी दिले. मात्र, गेली अनेक वर्षे फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. आताही त्यांनी दिलेल्या उत्तरांनी आम्ही समाधानी नाही.
- कुणाल कड, सदस्य, ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’
चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १५० कोटी, तर दुसऱ्या टप्पात १०० कोटींची कामे केली जाणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या पाच मिसिंग लिंकच्या निविदा काढल्या आहेत. ११ मिसिंग लिंकच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
- योगेश म्हसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’
PNE25V58633
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.