यशस्वी होण्यासाठी संगत चांगली हवी
चांगल्या संगतीमुळेच यशस्वी जीवनप्रवास

यशस्वी होण्यासाठी संगत चांगली हवी चांगल्या संगतीमुळेच यशस्वी जीवनप्रवास

Published on

पिंपरी, ता. ९ ः ‘‘फिल्म इंडस्ट्रीला विनाकारण बदनाम केले जाते. अनेकदा नकारात्मक सूर उमटतो, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. तुमची संगत कोणाशी आहे, यावर तुमचा प्रवास ठरत असतो. मी आजपर्यंतच्या प्रवासात कधीच कोणतेही व्यसन केले नाही. त्यामुळे यशस्वी प्रवास करतो आहे. तरुणांनाही माझे आवाहन आहे की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, संगत चांगली असायला हवी,’’ असा सल्ला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी दिला.
‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ माध्यम समुहा’ने ‘सुदेश भोसले लाइव्ह’ संगीतमय कार्यक्रम शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी साडेसहा वाजता काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे आयोजित केला आहे. या सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून बच्चन यांचे अभीष्टचिंतन करण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना, रसिक श्रोत्यांना मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाला सुदेश भोसले आणि सहगायक मकरंद पाटणकर यांनी भेट दिली. त्यावेळी भोसले यांनी त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडत बच्चन यांच्यावर चित्रित विविध गाण्यांचा आढावा घेतला आणि संगीत क्षेत्रातील संधींचे सोने करण्याचा सल्लाही तरुणाईला दिला. काही गाणी सादर करून त्यांनी गाण्यांचे मुद्रण करतानाच्या आणि वडिलांसोबत चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याच्या, आई व आजीचे गाणे, गोव्यातील शिरोडा येथील घरी झालेले चित्रीकरण आदी आठवणी सांगितल्या. शिवाय, दादा कोंडके, आर. डी. बर्मन, सचिनदा, किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, देवानंद, शशी कपूर, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, विनोद खन्ना, सजीवकुमार, असरानी आदींसमवेत काम करताना घडलेले किस्से ऐकवत आपला आजपर्यंतचा यशस्वी प्रवासही उलगडला. ‘सुरुवातीला पोस्टर रंगवणाऱ्या माझ्या हाती माईक कधी आला आणि हातातून ब्रश कधी दूर गेला हे कळलेच नाही’, अशी भावनिक आठवण त्यांनी नमूद केली.

पहिला ‘शो’ पुण्यात
सुरवातीला वाढदिवसांनिमित्त किंवा गल्लीतील एखाद्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम करायचो. पण, पहिला जाहीर ‘शो’ पुण्यात केला आणि त्यानंतर सलग दहा दिवस मुंबईबाहेर ‘शो’ केले. तेव्हापासून पायाला भिंगरी लागली आहे. विविध राज्यांसह परदेशांत कार्यक्रम केले आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमात सर्व कलाकार पंजाबी होते. त्यात एकटा मी मराठी गायक होतो.

तरुणांनी महाराष्ट्राबाहेर पडावे
पुणे, मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी कलाकार खूप आहेत. प्रत्येक भागात कलाकार आहेत. सुगम संगीत, भक्ती संगीत, चित्रपट संगीत, शास्रीय-उपशास्रीय संगीताचे जाणकार आहेत. मात्र, बरेचसे कलाकार महाराष्ट्राबाहेर पडत नाहीत. कारण, प्रत्येक राज्यातच नव्हे तर प्रत्येक देशात मराठी माणूस आहे. त्यांना मराठीची अभिरुची आहे. त्यांना मराठी गाणी हवी आहेत. त्यासाठी मराठी कलाकारांनी महाराष्ट्राबाहेर पडले पाहिजे. त्यांना मोठी संधी आहे. त्यासाठी सर्व भाषा शिकल्या पाहिजेत, असा सल्ला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी दिला.

गायकांची एक परंपरा
संगीत व गायन क्षेत्राला मोठी परंपरा आहे. किशोरकुमार, महंमद रफी, मुकेशजी, आर. डी. बर्मन, लता दीदी, आशा भोसले अशी परंपरा आहे. त्यांच्या समवेत अनेक गाणी गायली आहेत. अनेक कलाकारांच्या आवाजात गाणी गाण्याची संधी मिळाली. आणि विविध कलाकारांचा आवाज काढता येणे ही परमेश्वराची देण आहे.

गाण्यांसोबत संवादही...
अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाण्यांसह अनेक चित्रपटातील गाण्यांपूर्वी काही संवाद आहेत. ते संवादही रसिकांच्या मनांत नेहमी रुंजी घालत असतात. त्या संवादांसह गाणी गुणगुणणारे रसिक प्रेक्षक आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे आम्हीही काही गाणी संवादांसह सादर करणार आहोत. यामध्ये आनंद, दुःख, विरह, प्रेम, नृत्यमय असे वेगवेगळा मूळ असलेल्या गाण्यांचा समावेश आहे. रसिकांना ती
नक्कीच आवडतील, असा विश्‍वास आहे. त्यामुळे रसिकांसह चाहत्यांना विनंती आहे की, हा ‘शो’ चुकवू नका.

पुणे, पिंपरी-चिंचवडवर विशेष प्रेम
पुण्यात माझी सासरवाडी आहे. त्यामुळे पुणे असो की पिंपरी-चिंचवड या शहरांविषयी एक विशेष आकर्षण, आस्था नेहमीच राहिली आहे. पुण्याला येण्यासाठी एक ओढ असते. येथील रसिकांचे प्रेमही भरपूर मिळाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण २५-३० वर्षांनी कार्यक्रमासाठी आलो आहे. रसिकांचे प्रेम निश्चितच मिळेल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com