

माणमध्ये दुकानदारावर वार
पिंपरी : ‘तुला माहित आहे का, मी कोण आहे, मी इथला भाई आहे, मला सर्वांनी हप्ता द्यायचा’, असे म्हणत एका तरुणाने कोयत्याने किराणा दुकानदारावर वार करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना रविवारी (ता. २) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथे घडली. वैभव रघुनाथ बोडके (वय २४, रा. मुलाणी वस्ती, माण ता. मुळशी जि. पुणे) यांनी सोमवारी (ता. ३) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्नील बाळासाहेब पवार (रा. माण, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जाब विचारल्याने कुटुंबास मारहाण
पिंपरी : आईला त्रास का देता, याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन भावांसह आईलाही तिघा जणांनी मारहाण केली. ही घटना काळेवाडीतील गजानन कॉलनी येथे रविवारी (ता. २) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विजय नारायण सुरवसे (वय १९, रा. बालामण चाळ, महात्मा फुले कॉलेजच्या मागे, पिंपरीगाव) यांनी सोमवारी (ता. ३) याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश सूर्यवंशी, सुयश सूर्यवंशी आणि निखील पिसाळ (तिघेही रा. गजानन कॉलनी, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऑनलाइन ट्रेडिंगचा बहाणा, अडीच लाखांची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची दोन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत शिंदे वस्ती, नेरे गाव येथे घडली.
या प्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आर्या आनंद नावाचा व्यक्ती, तीन मोबाईल क्रमांक धारक आणि चार बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये जॉईन केले. त्यांना ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असे सांगितले. एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यात सांगत त्यांच्याकडून २ लाख ८० हजार ४३२ रुपये घेत त्यांची फसवणूक केली.
वाकडमध्ये तरुणाकडून पिस्तुल जप्त
पिंपरी : वाकड पोलिसांनी कावेरीनगर येथे एका तरुणाकडून ५० हजार रुपये किंमतीचे बेकायदेशीर पिस्तुल जप्त केले. ही कारवाई सोमवारी (ता. ३) रात्री साडेआठ वाजता करण्यात आली. सुनील मोहन शिंदे (वय २५, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार तात्यासाहेब शिंदे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर पोलिस लाईन जवळ सापळा लावून आरोपी शिंदे याला ताब्यात घेण्यात आले.
तरुणास लोखंडी कड्याने मारहाण
पिंपरी : वेटर समजून तरुणाने हॉटेलमध्ये एकास पाणी मागितले, या कारणावरून संतापलेल्या आरोपीने तरुणास हातातील कड्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (ता. २) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळै सौदागर येथे घडली. निखील अमोल मंडल (वय २५, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी हर्षल विनोद महाडीक (वय २०, रा. नढेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंडल हे पिंपळे सौदागर येथील हॉटेल मित्र कृष्णा निताई मंडल याच्यासोबत जेवण करण्यासाठी गेले होते.
महिलेच्या बदनामी प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : महिलेच्या छायाचित्राचे पॅम्पलेट बनवून बदनामी केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १ मार्च रोजी चिंचवड येथे घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष अमीचंद शहा (वय ४०, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचे छायाचित्र असलेला पॅम्पलेट बनवून त्यावर अश्लील मजकूर लिहून तो प्रसारित केला. तसेच फिर्यादी महिलेची बदनामी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.