

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रोत्साहनामुळे इलेक्ट्रिक वाहने बाजारात आली. पण, या वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेज शहरात बोटावर मोजण्याइतकेच आहेत. दुरुस्तीसाठी मेकॅनिक मिळत नसल्याने रस्त्यात वाहन बंद पडल्यास शोरूमपर्यंत ढकलत नेण्याशिवाय पर्याय नसतो. तेथेही वाहनांचे सुटे भाग लवकर मिळत नसल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
इंधनांच्या वाढत्या किमतीमुळे काही नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आठ मार्चपर्यंत ५१ हजार ७८६ ई-वाहनांची नोंद झाली आहे. या वाहनांना इंधनाचा खर्च नाही. त्यामुळे प्रवास परवडतो. धूर नसल्याने पर्यावरणपूरक ही वाहने समजली जातात. पण, या वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची संख्या कमी असल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. शहरात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे शोरूम डझनाच्या जवळपास आहेत; मात्र त्यांच्या सर्व्हिस सेंटरची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहेत. तेही ‘‘आमच्या कंपनीची गाडी असेल, तर दुरुस्त करतो,’’ असे सांगत असल्याने वाहन चालकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
दुचाकींचे पार्ट्स मिळेनात
इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अनेकदा बिघाड निर्माण होतो. अशावेळी चालक वाहन दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जातात. मात्र, आवश्यक सुटे भाग लवकर मिळत नाहीत. त्यामुळे दुरुस्तीसाठी काही दिवस लागतात, असे काही मेकॅनिक खासगीत सांगतात.
मी इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले. दीड वर्षे वाहन चांगले चालले. एकदा ते नादुरुस्त झाल्यानंतर मेकॅनिकला दाखवले, तर कोणी तयार होत नव्हते. त्यामुळे मी सर्व्हिंस सेंटरमध्ये घेऊन गेलो. तेथही वाहनाचे सुटे भाग वेळेत मिळाले नाही. त्यामुळे वाहन तब्बल १८ दिवस तेथेच ठेवावे लागले.
- अतुल मस्के, वाहनचालक
पेट्रोलवर चालणारी वाहने व इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने यांच्यात मेकॅनिझमचा मूलभूत फरक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने दुरुस्त करण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भागही लवकर उपलब्ध होत नाहीत.
- अमोल गाडे, दुचाकी मेकॅनिक
शहरात ई-वाहने किती?
दुचाकी : ४२,४००
ई-रिक्षा : २४१
मालवाहू ई-रिक्षा : २७१
चारचाकी : ३ हजार २४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.