पीएमपीच्या ऑनलाइन पेमेंट सुविधेला वाहकांचा खोडा

पीएमपीच्या ऑनलाइन पेमेंट सुविधेला वाहकांचा खोडा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवाशांच्या तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली. मात्र, या सेवेत वाहकच खोडा घालत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ‘‘मशिन बंद आहे’’, ‘‘नेटवर्क नाही’’ अशी कारणे देऊन काही वाहक ऑनलाइन पेमेंट स्वीकारत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएमपी’नेही १ ऑक्टोबर २०२३ पासून कोथरूड आगारात ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली. प्रवाशांना तिकीट मशिनवरील कोड स्कॅन करून ‘गूगल पे’ किंवा ‘फोन पे’ने तिकिटाचे पैसे जमा करता येत आहेत. या सुविधेमुळे बसमध्ये सुट्या पैशांच्या कारणावरून वाद कमी होतील आणि प्रवाशांना रोख पैसे ठेवण्याची चिंता मिटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वाहकांच्या उदासीनतेमुळे आणि मशिनमधील त्रुटींमुळेच ही सेवा चर्चेत आहे.
दरम्यान, ‘सकाळ’ प्रतिनिधीने रविवार आणि सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मार्गांवर प्रवास करुन ऑनलाइन पेमेंट सुविधेची पाहणी केली. त्यावेळी वाहकांची उदासीनता समोर आली. बऱ्याचदा सुटे पैसे किंवा रोख नसल्यामुळे प्रवासी ऑनलाइन पेमेंटबाबत वाहकाकडे विचारणा करत आहेत. मात्र, त्यांना विविध उत्तरे देऊन रोकड देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. काही वाहक तर इतरांच्या खात्यात ऑनलाइन पैसे पाठवून त्यांच्याकडून रोख रक्कम घेण्याचा सल्ला प्रवाशांना देत आहेत. ‘सकाळ’ प्रतिनिधीने पाहणी केलेल्या पाचपैकी केवळ एकच बसमधील वाहक ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना दिसला. त्यामुळे प्रवाशांसाठीची ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू ठेवायची की नाही हे वाहकांच्या हाती असल्याचे यातून समोर आले आहे.


मी दररोज पीएमपीतून प्रवास करतो. प्रवासदरम्यान कधी सुट्टे पैसे नसल्यास ऑनलाइन पेमेंट करण्याचे विचारले असता थेट मशिन बंद असल्याचे सांगतात. पेमेंटसाठी प्रयत्न करा, असे सांगितले तरी मी काम करतो का तू अशी उत्तरे दिली जातात.
- प्रमोद माने, प्रवासी

वाहकांनी ऑनलाइन पेमेंट घेण्यास नकार दिल्यास प्रवाशांनी बस नंबर घेऊन त्या वाहकाची तक्रार करावी. वाहकांना ऑनलाइन पेमेंट घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहक सूचनांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com