चौकातील सफेद पट्टे गायब; वाहने सुसाट

चौकातील सफेद पट्टे गायब; वाहने सुसाट

Published on

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ : वाहन चालकांना सूचना देण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी सफेद पट्टे पाहायला मिळतात. वाहन चालकाने कोणते नियम पाळावेत, वाहन कसे चालवावे, याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी हे पट्टे असतात. अगदी पादचाऱ्यांसाठीही झेब्रा क्रॉसिंग आखून देऊन त्यांनी रस्ता कुठून ओलांडावा हे स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांचाही प्रवास सुरक्षित होतो. मात्र, शहरातील अनेक ठिकाणच्या चौकातील तसेच रस्त्यावरील सफेद पट्टेच गायब झाल्याचे दिसून येते. यामुळे सिग्नल लागल्यानंतरही वाहने थेट चौकात येत असून यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. तसेच अपघाताचा धोकाही निर्माण होतो.

चौकात सिग्नल लागल्यास झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर असलेल्या पट्टीच्या आत वाहन थांबविणे आवश्यक असते. त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडणे शक्य होते. मात्र, निगडीतील लोकमान्य टिळक चौक, आकुर्डीतील खंडोबा माल चौक, मोरवाडी चौक, नाशिक फाटा चौक, लांडेवाडी चौक, तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक आदी ठिकाणचे सफेद पट्टे गायब झाले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
सफेद पट्टा असतानाही सिग्नलवेळी त्यावर वाहन उभे करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मागील वर्षी अशा २८ हजार ४५८ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

गतिरोधकावर आदळतात वाहने
रस्त्यावर गतिरोधक असल्याचे वाहन चालकांना समजण्यासाठी त्यावर सफेद पट्टे असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या गतिरोधकावरील पट्टे गायब झाले आहेत. त्यामुळे अशा गती रोधकांवर वाहने आदळून अपघाताच्या घटना घडतात.


अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम करायचे आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर सफेद पट्टे आखण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सफेद पट्टे असल्यास वाहन चालकासह पादचाऱ्यांसाठीही सोयीचे ठरते.
- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर असलेल्या पट्ट्याच्या आत वाहन थांबविल्यास पादचाऱ्यांनाही सुरक्षितरित्या रस्ता ओलांडणे शक्य होते. वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास रीतसर कारवाई केली जात आहे. यापुढेही कारवाई सुरु राहणार आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक, शाखा, पिंपरी-चिंचवड


चौकात सफेद पट्टे असल्यास सुरक्षितरित्या रस्ता ओलांडणे शक्य होते. मात्र, काही वाहन चालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहन थांबवितात. त्यामुळे पायी रस्ता ओलांडताना अडचण निर्माण होते. अपघाताचा धोकाही निर्माण होतो.
- करण पिचे, पादचारी

चौकातील तसेच रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगसह इतरही सर्व पट्टे स्पष्ट दिसायला हवेत. मात्र, अनेक ठिकाणचे सफेद पट्टे गायब झाले आहेत. गती रोधकावरील पट्टेही स्पष्ट दिसत नाहीत. यामुळे त्यावर वाहने आदळतात. अपघाताच्या घटनाही घडतात. त्यामुळे ठळक दिसतील, असे सफेद पट्टे असणे आवश्यक आहे.
- सुनील राजेभोसले, वाहनचालक

वाहन चालकांवर २०२४ मध्ये केलेली कारवाई
महिना कारवाई दंड

जानेवारी १३४९ ९७९५००
फेब्रुवारी १४५९ ९५३५००
मार्च १५५५ ९३००००
एप्रिल २६१७ १७८५०००
मे २४८६ १६६७०००
जून ३३५४ २३५८५००
जुलै ४२६८ २९५७५००
ऑगस्ट ३९०६ २५८८०००
सप्टेंबर २००७ १३५२५००
ऑक्टोबर २२८७ १५४१५००
नोव्हेंबर ९८६ ६५७०००
डिसेंबर २१८४ १४२५०००
==========================================
झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्या वाहन चालकांवर २०२५ या वर्षात केलेली कारवाई
महिना कारवाई दंड
जानेवारी १९३३ १२५३५००
फेब्रुवारी १७२० ११४५०००

फोटो आयडी
96937
96938

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com