

प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ : संस्थेचे बँक खाते काढून त्याची माहिती सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना देणे बंधनकारक आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी उपनिबंधकांकडून केली जात आहे. बँक खाते नसल्यास संस्थांची नोंदणी करण्याला नकार दिला जात आहे. त्यामुळे शहरातील गृहनिर्माण संस्थांचे सभासद नोंदणी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करत असल्याचे चित्र आहे.
गृहनिर्माण संस्था अस्तित्वात येताना संस्थेची नोंदणी करण्याचा प्रस्ताव सहकारी संस्था कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर बँक खाते उघडण्यासाठी उपनिबंधकांकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जातो. गृहनिर्माण संस्थांकडून सभासदांचे शुल्क १०० रुपये आणि भागभांडवलची रक्कम ५०० रुपये घेतली जाते. त्याचा व्यवहार संस्थेने सुरू केलेल्या बँक खात्यामधून करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळच्या शाखेत बँक खाते काढण्याच्या सूचना सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने देण्यात येतात. खाते उघडल्यानंतर बँक शिलकेचा दाखला जमा करून आवश्यक नोंदणी शुल्क भरल्यानंतर संस्थेची नोंदणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दोन सहकारी संस्थांचे कार्यालय आहे. त्याअंतर्गत गृहनिर्माण संस्थांची नोंदणी होत आहे. या दोन्ही कार्यालयांकडून बँक खात्याची आवश्यक माहिती मागवली जात आहे. काही संस्थांकडून तीन महिन्यांची मुदत संपली, तरी माहिती मिळत नाही. अशा संस्थांना पुन्हा मुदतवाढ दिली जात आहे. त्याशिवाय संस्था नोंदणी करण्यात येणार नसल्याचे उपनिबंधकांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शहरातील दोन्ही कार्यालयातंर्गत सर्वच गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात येत आहे.
यासाठी बँक खाते आवश्यक
- सभासदांचे भागभांडवल संबंधित खात्यात जमा करण्यासाठी.
- नोंदणीनंतर आर्थिक व्यवहार करणे.
- सभासदांच्या पैशांचा परतावा देण्यासाठी.
- देणी अथवा इतर व्यवहारासाठी.
नोंदणीची जबाबदारी मुख्य प्रर्वतकांची
बँक खाते काढणे, त्याची माहिती सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांकडे देण्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेतील मुख्य प्रवर्तकांची आहे. त्यानंतर संस्थेची कार्यकारिणी अस्तित्वात येते. बँक खाते न देणाऱ्यांना मात्र नोंदणी न देणे एवढीच कारवाई उपनिबंधक करत आहेत.
गृहनिर्माण संस्थांची आकडेवारी
१) उपनिबंधक कार्यालय तीन - ३,९९८
२) उपनिबंधक कार्यालय सहा - ३,२२४
सहकारी संस्थांच्या कार्यालयांचा पत्ता -
१) उपनिबंधक सहकारी संस्था तीन - राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, संत तुकारामनगर, पिंपरी.
२) उपनिबंधक सहकारी संस्था सहा - पुणे मुंबई रस्ता, साई निकेतन इमारत दुसरा मजला. बीएसएनएल फुगेवाडी कार्यालयावर.
गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीसाठी बँक खात्याची अट आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते काढण्याची अट चुकीची आहे. सध्या या बँकांची स्थिती पाहता तिथे खाते काढण्यास सभासद तयार होत नाहीत. तसेच नेटबँकिंग व इतर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे इतर बँकेतही खाते काढण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. सहकार खात्याने यामध्ये बदल करावा. आम्हीदेखील पाठपुरावा करत आहोत.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.
गृहनिर्माण संस्थांनी बँक खाते काढून त्याची माहिती कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जात नाही. अनेक वेळा काही संस्थांची सभासद संख्या मोठी असल्याने मुदतीत बँक खात्याची माहिती दिली जात नाही. अशा संस्थांना मुदतवाढ देतो. मात्र, त्यांची नोंदणी करून घेतली जात नाही.
- मुकुंद पवार, उपनिबंधक, सहकारी संस्था सहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.