गुन्हेगारी जगत : आजचे क्राइम
थेरगावातील जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी : थेरगाव येथील डांगे चौकात लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारने छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (ता. ११) रात्री पावणे आठ वाजता करण्यात आली. संदीप राघू कांबळे (वय ४३, रा. बालेवाडी), अनिकेत देविदास घुले (वय ३१, रा. बोपखेल), निखिल धनराज पोळ (वय २९, रा. चिखली), लवेश जगन्नाथ पालांडे (वय ३८, रा. चिखली), तुकाराम कलाप्पा काटकर (वय ३२, रा. कात्रज), सतप्पा वैजनाथ सुरवसे (वय ३५, रा. फुरसुंगी), रफिक मोईनुद्दीन शेख (वय ४२, रा. घोरपडीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार तुषार शेटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जुन्या भांडणावरून घरात तोडफोड
पिंपरी ः जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका महिलेच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड केली. महिलेला आणि तिच्या मुलाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (ता.९) रात्री साडेदहा वाजता वाघेरे कॉलनी क्रमांक दोन, पिंपरी गाव येथे घडली. जयेश शिंदे, शुभम साळुंखे (दोघे रा. पिंपरी गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणास अटक
पिंपरी ः पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरूणास अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता.१०) रात्री अकरा वाजता गहुंजे गाव येथे करण्यात आली. स्वप्नील किसन मुऱ्हे (वय ३४, रा. सोमाटणे गाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गहुंजे गाव येथे स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती पिस्तूल घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून स्वप्नील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
जावयाला लोखंडी गजाने मारहाण
पिंपरी ः सासरे, मेहुणा आणि पत्नी या तिघांनी मिळून जावयाला बेदम मारहाण केली. पत्नीला तिच्या बहिणीला भेटू देत नसल्याच्या कारणावरून हे भांडण झाले. याप्रकरणी पत्नी, सासरे आणि मेहुणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) सकाळी साडेसात वाजता बोपखेल येथे घडली.
रोहिदास शहादेव वाल्हेकर (वय २९, रा. बोपखेल) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरे जालिंदर भानुदास ससाणे (वय ५२), धीरज जालिंदर ससाणे (वय २२, दोघे रा. सोलापूर) आणि पत्नी (वय २५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामावरून काढल्याने तरुणास मारहाण
पिंपरी ः कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अयप्पा मंदिराशेजारी काळेवाडी येथे घडली.
अर्पित सिंग परिहार (वय २३, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत विश्वास माने (रा. थेरगाव), सोफियान मुस्ताक शेख (रा. काळेवाडी), उमेश कसाळे (रा. रहाटणी), कुशल पुरषवानी (रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अर्पित हे बांधकाम साईटवर मजुरीचे काम करतात. आरोप कुशल याला अर्पित यांनी कामावरून काढले असल्याचा गैरसमज आरोपींना झाला.
कामगाराकडून वेल्डिंग वायरचा अपहार
पिंपरी ः कंपनीमधील भांडार विभाग प्रमुखाने वेल्डिंग वायरचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना निघोजे येथे घडली. या प्रकरणी अविनाश पोपटराव चोरमले (वय ५०, रा. पिंपळे
गुरव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निशांत दीपक गुंटे (वय २८, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चोरमले आणि आरोपी निशांत हे निघोजे येथील एकाच कंपनीत काम करतात. चोरमले यांनी कंपनीतील ८१ हजार रुपये किंमतीच्या कॉपर धातूच्या वेल्डिंग वायर निशांत यांच्याकडे दिल्या होत्या.
जादा परताव्याच्या आमिषाने एक कोटींना गंडा
पिंपरी ः डब्ल्यूएफएक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कंपनीत गुंतवणूक केल्यास १५ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दिघी येथे उघडकीस आला. हा प्रकार ९ डिसेंबर २०२२ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने ११ मार्च २०२५ रोजी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन कोलते, त्याची पत्नी आणि वडील अविनाश कोलते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेला ८० लाख रुपये गुंतवणूक करण्यात भाग पाडले. सुरुवातीला सहा महिने एकूण ९ लाख २९ हजार रुपये परतावा देण्यात आला. त्यानंतर मागणी करून देखील महिलेला त्यांचा परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही. आरोपींनी फिर्यादी महिलेप्रमाणेच इतर लोकांचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

