इलेक्ट्रीक वाहन खरेदीची ‘बॅटरी डाउन’

इलेक्ट्रीक वाहन खरेदीची ‘बॅटरी डाउन’
Published on

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तब्बल एक लाख ९१ हजार ९५६ वाहनांची नोंदणी झाली आहे. तर, २०२३ या वर्षात वाहननोंदणी एक लाख ७७ हजार ५६९ एवढी होती. याच कालावधीत इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी अनुक्रमे १० हजार ९१८ आणि १७ हजार ३७० एवढी होती. त्यामुळे वाहन नोंदणीत २०२४ मध्ये आठ टक्के वाढ झाली असली तरी, इलेक्ट्रीक वाहन नोंदणीत मात्र तब्बल ३८ टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये सकारात्मक वातावारण असून, वाहन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. नागरिकही वाहन खरेदी करताना वाहनांच्या लूकसह फीचर्सला जास्त महत्त्व देत असून, नवनवीन फीचर्स असलेल्या वाहनांना पसंती देत आहेत. बाजारात विविध कंपन्यांच्या प्रीमियम कारला मोठी मागणी असून, काही मोटारीसाठी नागरिकांना दोन-तीन महिने वेटिंग करावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक वाहने देखील बाजारात दाखल होत आहेत. शासनाने पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्यासाठी ई-वाहन धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत इलेक्ट्रीक वाहन खरेदीदारांना सवलती दिल्या आहेत. पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहन वापरणे अत्यंत कमी खर्चिक आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्यास देखील हातभार लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर सुरुवातीला २०२२-२३ च्या सुमारास नागरिकांनी इलेक्ट्रीक वाहनखरेदीला प्राधान्य दिले. पण इलेक्ट्रीक वाहनांच्याबाबत नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण होत नसल्याने आता नागरिक पुन्हा एकदा सीएनजी, पेट्रोल आणि पेट्रोल/सीएनजी (हायब्रीड) वाहनांच्या खरेदीला वळले आहेत.
-------
राज्यात २१ टक्के घटली
राज्यात २०२४ मध्ये एक लाख ५५ हजार १०० इलेक्ट्रीक वाहनांची नोंद परिवहन विभागात झाली आहे. तर २०२३ मध्ये एक लाख ९४ हजार ३१८ इलेक्ट्रीक वाहनांची नोंद झाली होती. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये तब्बल २१ टक्के इलेक्ट्रीक वाहनांची विक्री घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

काय आहेत कारणे?
- इलेक्ट्रीक वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेजची संख्या कमी
- वाहनांचे सुटे भाग मिळेनात
- शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या कमी
- महामार्गांवर सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन नाहीत
- चार्जिंगसाठी लागणारा वेळ
- पुन्हा विक्री करताना वाहनाच्या किमतीची हमी नाही
---------------
नागरिकांनी वाहन खरेदी केल्यावर आरटीओत वाहनांची नोंद होते. त्यामध्ये सर्वच वाहनांच्या नोंदी होतात. गेल्या वर्षी वाहनांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. यातून आरटीओला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त झाला आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
---------
वर्ष - पेट्रोल - डिझेल - सीएनजी - पेट्रोल/सीएनजी - इलेक्ट्रीक - एकूण
२०२४ - १,१५,५५३ - २२,१३५ - ९,०६६ - २२,६७१ - १०,९१८ - १,९१,९५६
२०२३ - १,०७,४६० - २०,४५१ - ७,६०८ - १९,६४२ - १७,३७० - १,७७,५६९
२०२२ - ९३,००६ - १७,२९१ - ६,४६४ - १५,५७३ - १५,८७६ - १,४९,५९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com