धुळवडीच्या रंगात रंगले नागरिक होळीचाही उत्साह ः घरोघरी पुरणपोळीचा बेत

धुळवडीच्या रंगात रंगले नागरिक
होळीचाही उत्साह ः घरोघरी पुरणपोळीचा बेत
Published on

पिंपरी, ता. १४ ः लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा विविध रंगांमध्ये न्हाऊन निघालेले अबालवृद्ध, शहरातील सोसायट्या, कॉलनी येथे नागरिकांनी सहकुटुंब एकत्र येत केलेली रंगांची उधळण, ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेले धुळवडीचे कार्यक्रम, महाविद्यालयाच्या आवारात, कट्ट्यावर व वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केलेली धुळवड, ‘होळी दिन दिल मिल जाते है’, ‘आला होळीचा सण लय भारी’, ‘रंग बरसे..’ यांसारख्या गाण्यांवर महिला व तरुणांनी धरलेला ठेका, अशा वातावरणात शुक्रवारी (ता. १४) धुळवडीचा सण उद्योगनगरीत साजरा करण्यात आला.
धुळवड म्हणजे रंगांचा आनंदाचा व उत्साहाचा सण. पिंपरी चिंचवडकरांनी हा सण आपल्या आप्तस्वकीयांसोबत एकमेकांना रंग लावत साजरा केला. महाराष्ट्रात रंगपंचमीला रंग खेळला जातो. मात्र, देशभरात बहुतांश ठिकाणी धुळवड साजरी होत असल्याने शहरातही अनेक ठिकाणी धुळवडीला रंग खेळला जातो. या वर्षी हा सण साप्ताहिक सुटीला जोडून आल्याने सहकुटुंब शहराबाहेरील रिसॉर्टस् व हॉटेल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठीही नागरिकांनी आगाऊ बुकिंग केले होते. शहरातील रस्तोरस्ती, चौकाचौकात, मैदानांवर सकाळपासूनच रंग खेळताना नागरिक दिसून आले.

होळीचा सण उत्साहात
त्यापूर्वी गुरुवारी (ता. १३) शहरात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला. होळीच्या तयारीसाठी सकाळपासूनच बाजारात गोवऱ्या, ऊस, विड्याची पाने, फुले, हार व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. त्यानंतर घरोघरी, सोसायट्यांमध्ये व मंदिरांपुढे होळी पेटविण्यात आली. महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहात आपल्या परंपरेप्रमाणे होळीची पूजा केली.

तरुणाईचा जल्लोष
धुळवडीच्या सणाचा उत्साह तरुणांमध्येही दिसून आला. कार्यालये व महाविद्यालयांना सुटी असल्याने तरुणांनी आपल्या मित्रमंडळींसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला. अनेकांनी आपल्या घराजवळील लॉन्स अथवा रिसॉर्टवर साजऱ्या केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रुपचे बुकिंग केले होते तर काहींनी घरीच मित्रांना बोलावून धुळवड साजरी केली. तरुणाईचा कल नैसर्गिक कोरड्या रंगांनी होळी खेळण्याकडे दिसून आला.

डीजेवर नागरिकांनी धरला ठेवा
शहरातील निगडी, आकुर्डी, रावेत, मोशी, भोसरी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, रावेत, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, किवळे या भागांमधील मोठ्या टाऊनशिप व सोसायट्यांमधील रहिवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी लावण्यात आलेल्या ‘डीजे’ च्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. तर काही ठिकाणी विशेष सांगितीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com