

हिंजवडीत मारहाणप्रकरणी
मोटारचालकाला अटक
पिंपरी, ता. १४ ः दुचाकीचा मोटारीला धक्का लागल्याने नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून मोटारचालकाने ‘तुम्हाला माहीत आहे का, मी कोण आहे, तुम्हाला मारून टाकीन’ अशी धमकी देत दोघांना मारहाण केली. हा प्रकार हिंजवडीतील विनोदे वस्ती येथे घडला.
याप्रकरणी श्रावण पाटील (रा. चांदणी चौक, बावधन) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर निवृत्ती काळभोर (वय ३५, रा. आकुर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास फिर्यादी यांचा मित्र ऋषिकेश माताडे याच्या दुचाकीचा आरोपीच्या मोटारीला धक्का लागला. नुकसान भरपाई देण्याबाबत बोलणे सुरु असताना मोटारीतील आरोपीने फिर्यादीचा मित्र राहुल गुंजाळ यांचा पाय धरून ओढले. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीचा मित्र केतन भोळे यास धमकी दिली.
-----------------------
महिलेची सव्वा तीन कोटींची फसवणूक
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून सव्वा तीन कोटी रुपये उकळले. मात्र, नंतर हे पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे घडला.
याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲक्सिल दलिप, अझीझ एहमद, जोसेफ शर्मा या नावाच्या व्यक्तींसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीपैकी एकाने विवाहसंबंधी संकेतस्थळावरून फिर्यादीशी ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून त्याच्या व्यावसायिक अडचणी दूर करण्यासाठी, दुबईत बँक खाते रेग्युलराइज करण्यासाठी, उपचारासाठी, कर्ज फेडण्यासाठी, दुबई ते दिल्ली प्रवासाचा खर्च, व्ह्नेनेझुएला ते दुबई प्रवासाचा खर्च अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपी ऍक्सिल व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी तीन कोटी १६ लाख ७८ हजार रुपये घेतले. मात्र, नंतर हे पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली.
----------------------------------------
टोळक्याकडून एकाला मारहाण
पिंपरी : कंपनीच्या मालकाला युएसडीटी करन्सी देण्यासाठी दिलेले तीन लाख रुपये दे असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने कामगाराला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. हा प्रकार मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे घडला.
याप्रकरणी राजेशन मुन्नीकंदन कन्ना (रा. फेज १, हिंजवडी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिन्मय सुभाष देंडगे (वय २०, रा. देंडगे वस्ती, जांबे), आशिष चंद्रशेखर चौधरी (वय २१, रा. सुसगाव), सात्त्विक ऋषी जेटली (वय २०), यश गोविंद मोडवानी (वय १९, दोघेही रा. कवळे) यांना अटक केली आहे. तर भैरू ऊर्फ भैरव प्रताप गुजर (वय २६, रा. महाळुंगे, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादी यांना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास म्हाळुंगे येथील बॉम्बे हाय क्लब येथून जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर फिर्यादीच्या कंपनीचे मालक रमेश व अरुण यांना यूएसडीटी करन्सी देण्यासाठी दिलेले तीन लाख रुपये तू दे, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.