

हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण
पिंपरी : वाकड येथे एका हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना विनोदेवस्ती वाकड येथे घडली. संभाजी त्रिंबक चव्हाण (रा. बाणेर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक अविनाश सरगर (वय २४), बासुराज शंकर हेळवे (वय ३०, दोघेही रा. बिजलीनगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे विनोदेवस्ती वाकड येथील एका हॉटेलमध्ये होळी खेळण्यासाठी गेले होते. तिथे एका कामगाराला आरोपी मारहाण करत होते. दरम्यान, चव्हाण हे हॉटेलमधून बाहेर आले असता आरोपींची चव्हाण यांना हॉटेलमधील कामगाराचा साथीदार समजून बेदम मारहाण केली. ‘भाई सोबत पंगा घेतोस का,’ असे म्हणत त्यांच्या डोक्यावर, हातावर, मानेवर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
भांडण सोडविल्याच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : भांडण सोडविल्याच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना बोपखेल येथे घडली. विशाल शामे वाल्मीकी (वय २६, रा. रामनगर, बोपखेल) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पियुष रोकडे (वय २३), दीपचंद यादव (वय २५) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विशाल हे त्यांच्या मित्रांसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी विशाल यांना बाजूला नेऊन भांडण सोडविल्याच्या रागातून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विशाल यांच्या कानाला, डोक्यात आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे.
दोन तरुणांना मारहाण व मोटारीची तोडफोड
पिंपरी : चौघांनी मिळून दोन तरुणांना मारहाण केली. एका मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार चिखलीतील कुदळवाडी आणि पूर्णानगर येथे घडला. याप्रकरणी पन्नालाल राधेनाम यादव (वय २६, कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष चौहान, पप्पू चौहान, गुड्डू चौहान आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यादव आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या दुकानाच्या बाहेर ठेवलेले साहित्य फेकून दिले. दुकानातून सात हजार रुपये किमतीचा एक गॅस कटर आरोपींनी चोरून नेला. तसेच आरोपींनी पूर्णानगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या एका मोटारीची तोडफोड केली. यादव यांना फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली.
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : सोसायटीमधील फायर सिस्टीमचे टेस्टिंग करत असलेल्या तिघांना मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाला देखील मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मधील कल्पतरू इस्टेट फेज तीन येथे घडली. याप्रकरणी गौरव प्रकाश वैद्य (रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित दिघे, अजय पाटील, सचिन लोखंडे, राजशेखर संपगाव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौरव वैद्य आणि त्यांचे कर्मचारी त्यांच्या सोसायटी मधील फायर सिस्टीमचे टेस्टिंग करत होते. त्यावेळी रोहित दिघे मद्यप्राशन करून तेथे आला. त्याने गौरव यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रोहित याने अजय पाटील याला बोलावून आणले. दोघांनी मिळून गौरव यांना चिखलात लोळवून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ''पुण्यातून हाकलून देईन, कुटुंबाला संपवून टाकीन'', अशी आरोपींनी धमकी दिली. भांडण सोडविण्यासाठी गौरव यांचा भाऊ
आला असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.