गणरायासाठी लखलखती रोषणाई अन् विद्युत माळांचा थाट

गणरायासाठी लखलखती रोषणाई अन् विद्युत माळांचा थाट

Published on

पिंपरी, ता. २२ ः गणपतीची आरास खुलविण्यासाठी विद्युत रोषणाई ही हवीच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोसायटी किंवा घरगुती गणपतीसाठीही सध्या मोठ्या प्रमाणावर रोषणाईने सजावट केली जाते. म्हणूनच बाजारातही विद्युत माळांचे असंख्य प्रकार सध्या दाखल झालेले आहेत. यामध्ये एलईडी बल्बच्या माळा, पणत्या, झुंबर, विविधरंगी फोकस यासोबतच नकली फुलांच्या एलईडी माळांना यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणपतीच्या, मंदिराच्या किंवा मखराच्या मागे लावण्यासाठी एलईडीचा बल्ब असलेला बॅकड्रॉपही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवासाठी असंख्य व्हरायटी दुकानात आल्याने शहरातील पिंपरी मार्केटसोबतच उपनगरातील बाजारपेठांही विद्युत रोषणाईंच्या माळांनी लखलखत आहेत.

घरगुती गणेशोत्सवसाठी मोठी मागणी
सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणपतीपुढेही देखावे किंवा थीमनुसार सजावट करण्याची पद्धत घरोघरी दिसू लागली आहे. ही सजावट आकर्षक करण्यासाठी विविध प्रकारच्या रोषणाईचा वापर केला जात आहे. विशेषतः सेलवर चालणाऱ्या पणत्या, विविधरंगी फोकस, इलेक्ट्रिक समई यांना मोठी मागणी आहे. त्यापाठोपाठ क्रिस्टल व काचेचे झुंबर यांचीही खरेदी केली जात आहे. घरगुती गणपतीसाठी तसेच मंडळाच्या गणपतीसाठीही झुंबरांना मागणी असल्याने अगदी ५० रुपयांपासून ते दीड हजारांपर्यंतचे झुंबर सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत.

फोकस व क्रिस्टल लाइटला मागणी
एलईडी लाइटच्या फोकसला दरवर्षीच मोठी मागणी असते. घरगुती गणपतीसाठी लागणाऱ्या सिंगल फोकस पासून ते देखाव्यांसाठी आवश्‍यक १८, ३६, ६० एलईडी लाइट असणारे फोकसही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत. त्याशिवाय एक फुटापासून ते दहा फूट लांब असलेल्या एलईडी बल्बच्या माळा, क्रिस्टलच्या माळा, प्लॅस्टिक फुलांच्या विद्युत माळा यांना मागणी वाढली आहे. अनेक ग्राहक पुढे येणारे सणवार लक्षात घेता विद्युत माळांमध्ये इंडियन माळा, मल्टिकलर स्टार, गोल्डन क्रिस्टल माळा यांचीही खरेदी करताना दिसत आहेत.

एलईडी पाट्या
यंदा गणेशोत्सवात गणेशाची प्रतिकृती असलेली गणपती बाप्पा मोरया ही अक्षरे असलेली एलईडी पाटी बाजारात विक्रीस आली आहे. रोषणाईमध्ये हा नवीन प्रकार आल्याने अनेक लहान गणेश मंडळे याची खरेदी करत आहेत. या एका पाटीची किंमत ३५० रुपये आहे. तर, यातील दोन फुटापर्यंतच्या पाट्यांची किंमत २००० रुपयांपर्यत आहे.

‘‘गणेशोत्सवात दरवर्षीच फोकसला मोठी मागणी असते. घरगुती गणेशोत्सवासाठी एलईडी लाइटच्या माळा यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. तसेच नवीन आलेल्या एलईडी पाट्या, फुलांमधील एलईडी लाइटच्या माळा यांना मोठी मागणी आहे.’
- अर्जुन पटेल, विक्रेता, पिंपरी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com