सुंदर जीवनासाठी वृक्षांशी मैत्री करा

सुंदर जीवनासाठी वृक्षांशी मैत्री करा

Published on

‘सकाळ’ आणि यशदा रिॲलटी ः लोगो

पिंपरी, ता. २४ : ‘‘अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्हीं लोक।’ संत ज्ञानेश्वर माउलींच्या या ओवीप्रमाणे वृक्षारोपणातून कार्य घडत आहे. देव केवळ मंदिरात नसून रानावनात आहे. त्यामुळे वृक्षाला मित्र माणून त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे आपल्यासह सर्वांचे जीवन सुंदर होईल. वृक्षांच्या सहवासात गेल्याबरोबर आपला आनंद द्विगुणीत होतो,’’ असे प्रतिपादन देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी रविवारी (ता. २४) केले.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲलटी ग्रुप यांच्यातर्फे `My Tree - मैत्री’ उपक्रमांतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून हाकेच्या अंतरावर मुंबई-पुणे महामार्गालगत रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. यशदा रिॲलटी ग्रूपचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत काटे, उपाध्यक्ष (मार्केटिंग ॲंड सेल्स) रोहिदास गवारी, संचालक सूर्यकांत जाधव, विजय काटे, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. नीलेश लोंढे, ‘पवना जलदिंडी’चे सूर्यकांत मुथियान, राजीव भावसार, भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळूंज, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जंगल फाउंडेशनचे विश्वनाथ टेमघरे, बांधकाम व्यावसायिक संजय भिसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता सुनील भागवानी, अभिषेक कविटकर, आर्किटेक्ट शितेश अग्रवाल, वाडिया हॉस्पिटल येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश गवारे, कर्नल (निवृत्त) तुकाराम गव्हारे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आदी उपस्थित होते.

मोरे महाराज म्हणाले, ‘‘झाडांच्या सानिध्यात आपल्याला स्वच्छ प्राणवायू मिळतो. त्याने आपले आंतरइंद्रिये निर्मळ होतात. एकवेळ अन्न-पाण्याशिवाय आपण जगू शकतो. पण, काही क्षण श्वास मिळाला नाही, तर जगू शकणार नाही. माणूस दिवसभरात २१ हजार वेळा श्वास घेतो. हा श्वास वृक्षांपासून मिळतो. वृक्ष लावणे हे परमेश्वरी कार्य आहे.’’
‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी आभार मानले. ते म्हणाले, ‘‘बिल्डर घरं बांधतात, ‘सकाळ’ घरातल्या माणसांची बांधणी करते. सिमेंटची जंगलं तयार होत असल्याचे वारंवार म्हटले जाते. पण, यशदा रिॲलटी ग्रूप प्रत्येक ग्राहकांच्या नावे व त्यांच्याच हस्ते वृक्षरोपण करत आहे. यामुळे राहण्यायोग्य वातावरण निर्माण होत आहे. त्यांचे वृक्षारोपणाचे प्रयत्न ‘सकाळ’साठी महत्त्वाचे आहेत. ‘यशदा ग्रूप’चे कार्य असेच सुरू राहील आणि लाखो झाडांचे रोपण त्यांच्या माध्यमातून होतील, असा विश्‍वास आहे.’’
वृक्षसंवर्धानाची शपथ घेतल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचे उद्‍घाटन झाले. त्यानंतर आलेल्या सर्वांनी कुटुंबासह वृक्षारोपण केले. लावलेल्या रोपांच्या खोडाजवळ सेंद्रीय खत व पाणी घातले.

वृक्षसंवर्धानाची शपथ
‘‘मी आज परमेश्वर व माझ्या अंतःकरणाला साक्षी ठेवून शपथ घेतो की, मी दरवर्षी किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन. फक्त झाड लावून थांबणार नाही, तर ते जगवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. मी कुठेही झाडांची तोड होत असल्यास ती थांबवण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला आणि समाजाला झाडे लावण्यासाठी प्रेरित करेन. स्वच्छ, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन.’’

तीन वर्षे निगा राखणार : वसंत काटे
‘‘प्रत्येक व्यक्तीने झाडे लावली पाहिजेत. सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. भविष्यात आपल्याला ऑक्सिजन किट सोबत ठेवावी लागेल की काय? असी परिस्थिती आहे. तशी वेळ येऊ नये, यासाठी आपण सर्वांनी वेळीच जागे होऊन झाडे लावली पाहिजेत. आम्ही जेवढी घरे बांधली तेवढी झाडे लावत आलो आहोत. झाडांची निगा राखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. झाडांचे योग्य संगोपण केले जाते. आज लावलेल्या झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे. ‘यशदा रिॲल्टी’च्या ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जात आहे,’’ असे यशदा रिॲलटी ग्रुपचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत काटे यांनी सांगितले.

शहरात पायाभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. घरे बांधण्यासाठी हरित पट्ट्यातील भूखंडाचे निवासीकरण केले जात असल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड

आज ताणतणाव वाढत असून जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मानवाला निरोगी राहण्यासाठी आहार, व्यायाम, झोप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर श्वास देणाऱ्या निसर्गाचे संगोपनही महत्त्वाचे आहे. झाडांच्या सानिध्यात माणसिक ताण कमी होत असल्याने स्वतःबरोबर झाडांचीही काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. नीलेश लोंढे, आयुर्वेदतज्ज्ञ, भोसरी

वृक्षारोपणासारख्या उपक्रमांतून संतांनी ३७५ वर्षांपूर्वी दिलेला संदेश आज सत्यात उतरत आहे. एक झाड लावून त्याचे संगोपन म्हणजे दहा मुलांचे संगोपन केल्यासारखे आहे. जगात वाढत चालले प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे.
- विठ्ठल वाळूंज, भूगोल फाउंडेशन, मोशी

ड्रेनेज, एसटीपी, डब्ल्यूटीपी विकसित केले जात नाहीत. केवळ बांधकाम संस्कृती रुजविली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भविष्यात आपले जगणे मुश्कील होईल. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपण पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.
- सूर्यकांत मूथियान, पवना जलदिंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com