महायुती की स्वतंत्र लढण्याबाबत उत्सुकता

महायुती की स्वतंत्र लढण्याबाबत उत्सुकता

Published on

पिंपरी, ता. २५ ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. परंतु, या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर प्रबळ असणाऱ्या महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात एकत्र लढण्यावर एकमत दिसत नाही. पक्षश्रेष्ठी जोपर्यंत निर्णय देत नाहीत, तोपर्यंत इच्छुकांपुढे लढतीचे चित्र अस्पष्ट असेल. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढण्याचे वारंवार जाहीर केले असले तरी ऐनवेळी ते काय निर्णय घेणार हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिल्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर २०२५ अखेर निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे संकेत दिले. त्यातच नुकतीच महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ही रचना कशी असणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता २०१७ प्रमाणेच प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली आहे. मागील प्रभाग रचना माजी नगरसेवकांसाठी दिलासादायक असली तरी नवीन इच्छुकांना मात्र आव्हानात्मक आहे. नवीन प्रभाग रचना जाहीर होण्याचा अंदाज बांधून ज्या भागात नवख्या इच्छुकांनी मागील काही वर्षे तयारी केली. अशांचा मात्र या प्रभाग रचनेमुळे हिरमोड झाला आहे. मात्र, तयारी जय्यत आहे.

महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र?
महापालिका निवडणूक महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत अद्याप अस्पष्‍टता आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांनी अद्याप निर्णय न दिल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते तटस्थ आहेत. एकत्र लढले तर; जागा वाटपात अनेकांची तिकिटे कापली जातील. ‘तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले’ असे म्हणण्याची वेळ भाजपच्या माजी नगरसेवकांवर येईल. मात्र, भाजप राज्याच्या सत्तेत मोठा भागीदार असल्याने आपल्या वाट्याला मोजक्याच जागा दिल्यास अनेक प्रभागांतील हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याची भीती राष्ट्रवादीच्या मातब्बरांना वाटू लागली आहे. शिवसेनेसह इतर घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी करण्यासाठी किमान २५-३० जागा सोडाव्या लागल्यास त्याचा फायदा-तोटा कोणाला होणार? याचे आडाखे बांधले जात आहेत. यामुळे महायुती म्हणून महापालिका निवडणूक एकत्र लढण्यावर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइं (आठवले गट) व इतर घटक पक्षाच्या नेत्यांचे एकमत होणे गरजेचे आहे.

महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याचे वारंवार जाहीर केले असले तरी ऐनवेळी त्यांचाही निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मागील विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सकारात्मक वातावरण पाहून राष्ट्रवादी दोन गटात विभागलेली असताना भाजपचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर नेते शरद पवार यांचा वैचारिक प्रभाव असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढतील असे सध्याचे चित्र आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रस्थापित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे स्थानिक पातळीवर उबाठाची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. तर, स्थानिक काँग्रेसने मागीलवेळी खातेही उघडले नसल्याने त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. शिवाय, इतर घटक पक्ष मोठ्या पक्षावर अवलंबून असल्याने जागा वाटपावरून त्यांच्यात वाटाघाटी कशी होणार हे पहावे लागणार आहे.

२०१७ चे पक्षीय बलाबल
पक्ष/गट - नगरसेवकांची संख्या
भारतीय जनता पक्ष : ७७
राष्ट्रवादी काँग्रेस : ३६
शिवसेना : ९

काँग्रेस : ०
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : १
अपक्ष : ५
एकूण : १२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com