गणरायाच्या वाटेतील खड्डेमय विघ्न दूर

गणरायाच्या वाटेतील खड्डेमय विघ्न दूर

Published on

पिंपरी, ता. २५ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील मुख्य विसर्जन मार्गांसह विसर्जन घाट मार्गांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेने प्राधान्य दिले असून, खड्डे बुजवून डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसामुळे निर्माण झालेले खड्डेमय रस्ते गुळगुळीत होणार असून, गणपतीच्या आगमनातील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार आहे. त्यामुळे गणरायाचा प्रवास सुखकर होणार आहे.
मे महिन्याच्या मध्यावर सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांत खड्डे पडले होते. खडी, मुरूम, कॉंक्रिट, कोल्ड मिक्सच्या माध्यमातून महापालिकेने ते बुजवले. मात्र, ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २७) गणरायाचे आगमन खड्डेविरहित रस्त्यांवरून होणार आहे.
गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गांवरील सर्व खड्डे बुजविण्याला सुरुवात केली आहे. सर्व ठिकाणी सक्षम वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार आहे. मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटांवर पुरेशी विद्युत व्यवस्था असेल. गणेशोत्सव कालावधीत संपूर्ण शहरात स्वच्छतेची विशेष मोहीम राबविली जाईल. स्थानिक पातळीवर सेवाभावी संस्था व गणेश मंडळे यांच्याशी समन्वय ठेवला जाईल. विसर्जन व मिरवणूक मार्गांवरील धोकादायक व अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाईल. विसर्जनाच्या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था असेल. मिरवणूक मार्गावर आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत यासाठी पथकांची नियुक्ती करून कार्यवाही केली जाणार आहे, यासंदर्भात संबंधित विभागांना आदेश दिला आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कळविले आहे.

महापालिका आयुक्तांकडून सुविधांचा आढावा
यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत उत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट तसेच इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यांसह आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
आगामी गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने महापालिका, पोलिस, महावितरण आदी विभागांची आढावा बैठक सोमवारी महापालिकेत झाली. त्यात अध्यक्षस्थानावरून आयुक्त शेखर सिंह बोलत होते. सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते. पोलिस प्रशासनातर्फे सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत माहिती दिली. महापालिकेतर्फे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले...
- शहरातील मुख्य विसर्जन मार्गांसह विसर्जन घाट मार्गावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य
- मार्गांवरील धोकादायक सर्व्हिस वायर, केबल इतरत्र हलवा
- विद्युतविषयक आवश्यक कामे करा
- विसर्जन घाटांवर आवश्यक कृत्रिम विसर्जन हौद तयार करा
- पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींच्या विसर्जनाची वेगळी व्यवस्था करा
- स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सर्व घाटांवर गणेशमूर्ती संकलन व्यवस्थापन
- विसर्जन केलेल्या मूर्ती वाहतुकीसाठी वाहनांचे योग्य नियोजन करा, मनुष्यबळ उपलब्ध करून द्या

- सर्व घाटांवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जीवरक्षकांसह जलद प्रतिसाद पथके तैनात करा
- अग्निशमन जवान आणि आपदा मित्र यांची नियुक्ती करा

मंडप परवानगी अर्ज तातडीने निकाली काढा
पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांना विविध परवाने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी कक्ष कार्यान्वित केली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी गणेश मंडळांना मंडप परवाने देताना उच्च न्यायालय व शासनाच्या आदेशांचे पालन करावे. अनधिकृत मंडप उभारले जाणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. तसेच मंडप परवानगीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढावेत. पुढील दोन दिवसांत अशा अर्जांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून परवाना देण्याबाबत कार्यवाही करावी, असा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com