गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

रोकड चोरणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : गणपती स्टॉलवरील एका मूर्तीकाराच्या पॅन्टमधून जबरदस्तीने १५ हजार रुपये चोरले. ही घटना भोसरीतील पीएमटी बस थांब्याजवळ घडली. या प्रकरणी गौरव दत्तात्रेय नलावडे (रा. धोलवड, ओतूर, ता. जुन्नर, पुणे) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बीपीएल सोलंकी गुजर आणि सुमीत बनोस राठोड (दोघेही रा. महाळुंगे रस्ता, चाकण) यांना अटक केली आहे. तसेच आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर असताना, आरोपी सुमीत राठोडने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १५ हजार रुपये जबरदस्तीने काढले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने चोर-चोर असा आवाज दिल्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या बीपीएल गुजर याला पकडले.

ऑनलाइन गुंतवणुकीच्या
नावाखाली १५ लाखांची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची १५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना दिघी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली. या प्रकरणी संदीप सुभाष शर्मा (रा. विजयनगर, दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिच्या सल्ल्यानुसार, शर्मा यांनी विविध बँक खात्यांत १५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला त्यांना ॲपमध्ये एक कोटी २१ लाख रुपयांचा नफा दिसला. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तो ब्लॉक झाल्याचे दिसले. आरोपीने नफा काढण्यासाठी २४ लाख २२ हजार २७९ रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगताच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाली.

तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या तडीपार गुंडाला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तुलासह अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. ही कारवाई पिंपळे निलख येथे रक्षक चौक ते पिंपळे निलखकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. पवन देवेंद्र बनेटी (वय २४, रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पवन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. पवन बनेटी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला.

गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई महाळुंगे येथे करण्यात आली. आकाश शिवाजी मोरे (वय २०, रा. सुसगाव) आणि संतकुमार जगनारायण प्रजापती (वय २५, रा. सुसगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. महाळुंगे येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश आणि संतकुमार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७६ हजार ५०० रुपये किमतीचा २१२ ग्रॅम गांजा जप्त केला.

पिंपरीत २७ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी : पिंपरीतील एच. ए. मैदानावर गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीकडून २७ हजारांचा गांजा जप्त करून त्याला अटक केली.
मीरशाकिरजाकीर हुसेन (वय २८, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हुसेन याच्याकडून २७ हजार ५०० रुपये किमतीचा ५६० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com