आंध्र प्रदेशच्या शिष्टमंडळाकडून प्रकल्पाची पाहणी
पिंपरी, ता. २९ : आंध्र प्रदेश येथील विविध महापालिका व संस्थांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी शहरात आले होते. त्यांनी शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी करताना महापालिकेच्या पर्यावरणपूरक धोरणांबद्दल समाधान व्यक्त केले.
शिष्टमंडळात तडीपात्री महापालिकेचे आयुक्त एस. शिव रामकृष्णा, विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. एन. व्ही. नरेशकुमार, कार्यकारी अभियंता के. गुरप्पा यादव, कार्यकारी अभियंता एम. नारायण स्वामी, तांत्रिक तज्ज्ञ श्रीनिवास रेड्डी, वरिष्ठ प्रकल्प सहकारी (सीडीएमए) एम. डी. जावेद आणि प्रकल्प सहकारी (स्वच्छ आंध्र कॉर्पोरेशन) एस. डी. रहतुल्लाह यांचा समावेश होता. या सर्वांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
आंध्र प्रदेश येथील शिष्टमंडळाने शहरातील दारोदारी कचरा संकलन व वर्गीकरण प्रक्रिया, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प, कचरा ट्रान्स्फर स्टेशन, मोशी येथील बांधकाम राडारोडा प्रक्रिया प्रकल्प, बायो मिथीलेशन प्रकल्प आदी प्रकल्पांची पाहणी केली. निवासी संकुले, औद्योगिक क्षेत्रे, व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, भाजीबाजार यासारख्या विविध स्त्रोतांमधून निर्माण होणारा घरगुती कचरा, प्लॅस्टिक, पालापाचोळा, उरलेले अन्न, जैविक व अजैविक कचरा, ई-कचरा तसेच जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या कामाची त्यांनी माहिती घेतली.
-----
शिष्टमंडळाने घेतली माहिती
- दापोडी शून्य कचरा प्रकल्प
- महिलांच्या सहभागातून कचरा संकलन पद्धती
- ओला व सोका कचऱ्याची विघटन प्रक्रिया
- सॅनिटरी वेस्ट इनसिनिरेटर प्रक्रिया
- मोशीतील २०० टीपीडी बांधकाम राडारोडा प्रक्रिया प्रकल्प
- कासारवाडी, गवळीमाथा आणि काळेवाडी येथील प्रत्येकी २०० मेट्रिक टन क्षमता केंद्रे
- मोशीतील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस (बायो मिथीलेशन) प्रकल्प
- हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालयांतील ओला कचरा संकलन व विघटन प्रक्रिया
शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांचा सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व काटेकोर नियोजन यांच्या जोरावर आज महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात एक आदर्श उभा केला आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका