विकास कामे सुचवा प्रभाग सुंदर बनवा !
पिंपरी, ता. २९ ः महापालिकेच्या (२०२६-२७) अर्थसंकल्पात नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आपापल्या प्रभागातील कामे सुचवता येणार आहेत. १५ ऑगस्टपासून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नागरिक कामे सुचवीत आहेत. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी सुचविलेल्या कामांमध्ये रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने आणि क्रीडांगणे अशा स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे.
महापालिकेच्या (२०२६-२७) अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी २००७-०८ या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश महापालिका अर्थसंकल्पात करत आहे. त्यानुसार, अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून दरवर्षी सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागांतील नागरिक आपल्या परिसरातील स्थानिक गरजा व दीर्घकालीन सुविधा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर अभिप्राय देत आहेत.
प्राधान्यक्रमाने निधी वाटप
मागील वर्षांप्रमाणे यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख, सर्वसमावेशक व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी नागरिकांच्या परिसरातून वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच हरित उपक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार केला जाणार आहे. नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचे संकलन व छाननी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. छाननीनंतर त्या अभिप्रायांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचे वाटप करण्यात येईल, असे महापालिकेने कळविले आहे.
अभिप्राय कसा नोंदवावा?
- महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून अभिप्राय नोंदवता येईल किंवा ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध आहे
- मालमत्ता कराच्या दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. हा निधी रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, सार्वजनिक सुविधा, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, सुरक्षा उपाय अशा कामांसाठी वापरला जाईल. क्षेत्रीय अधिकारी नागरिकांच्या सूचनांचे, माहितीचे मूल्यांकन करतील.
- नागरिक https://www.surveymonkey.com/r/D8TBZRH लिंकला भेट देऊन ऑनलाइन अभिप्राय नोंदवू शकता
- नागरिकांच्या अभिप्रायांचा विचार करून त्या भागातील विकास कामांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाईल
- नागरिकांनी दिलेले अभिप्राय नोंद झाल्यानंतर त्यांची ऑनलाइन ट्रेकिंग सुविधाही उपलब्ध असून, पारदर्शकता अधिक वाढेल
दृष्टिक्षेपात २०२५-२६ चा अर्थसंकल्प
- महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातून नागरिकांच्या सूचना ः २,२७९
- नागरिकांच्या सूचनांची छाननीनंतर स्वीकारलेल्या सूचना ः ७८६
- निधी उपलब्ध झालेले नागरिकांनी सुचवलेली कामे ः ४९९
असा मिळाला २०२५-२६ चा निधी (कोटी रुपयांत)
- नागरिकांनी सुचवलेल्या कामांना निधी ः ९४.८६
- नागरिकांनी सुचवलेल्याकामांना निधी वाटप ः १३८.९८
- ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर परिसरात कामांसाठी सर्वाधिक निधी ः ४३.८८
- ‘ब'' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रावेत, किवळे भागातील कामांसाठी सर्वात कमी निधी ः २०.६०
अर्थसंकल्पात कोणत्या कामांचा समावेश असावा, यासाठी नागरिकांनी दिलेल्या अभिप्रायामुळे स्थानिक गरजांची अचूक नोंद होऊन शहराच्या विकासाला दिशा मिळते. या प्रक्रियेमुळे केवळ सुविधा उभारणीच नव्हे तर नागरी जीवनमान सुधारणा, सार्वजनिक सेवांमध्ये समानता आणि संसाधनांचा योग्य वापर साध्य होतो. नागरिकांच्या अभिप्रायांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जवळपास १३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यंदाही नागरिकांनी अधिकाधिक अभिप्राय देऊन अर्थसंकल्प २०२६-२७ लोकाभिमुख बनवावा.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
---