खड्यांचे विघ्न दूर करण्याची प्रशासनाला क्षमता मिळो...!
भाष्य
--
मंगलमूर्ती मोरयाऽऽ म्हणत लाडक्या गणरायाचे स्वागत सर्वांनी केले आहे. दीड आणि तीन दिवसांच्या गणरायाला काही भाविकांनी निरोपही दिला आहे. गणेशोत्सवाचे उर्वरित आठ दिवस जल्लोषात जाणार आहेत. घरच्या गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्याची लगबग वाढणार आहे. पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या आणि अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला मिरवणुका काढून गणरायाला निरोप दिला जाईल. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहनही केले जाईल. ढोल-ताशांचा निनाद आणि टाळ-मृदंगाचा गजर होईल. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके होतील. विविध देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती वा समाजप्रबोधन केले जाईल. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे रथ साकारून त्यातून गणरायाची मिरवणूक काढली जाईल. या सर्व धामधुमीत खड्ड्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, यावर्षी मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे. तो थांबायचे नाव घेत नाही.
याशिवाय, महापालिका, मेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्यामार्फत विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यासह काही व्यक्तींनी खासगी कामासाठी खोदकामे केली आहेत. रस्त्यांवर आडवे चर खोदले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
मुरूम, खडी, विटा, माती, कॉंक्रिट, पेव्हिंग ब्लॉक, कोल्डमिक्स आणि हॉटमिक्स (डांबर) वापरून खड्डे बुजवल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी डांबरीकरणही करण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर जास्त असल्यामुळे खड्डे पुन्हा पडले आहेत. अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. मात्र, अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. सततच्या पावसामुळे ते पुन्हा उघड झाले आहेत. त्यामुळे देखावे बघणाऱ्या व विसर्जन मिरवणुकीला जाणाऱ्या भक्तांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न येणार आहे. अशा वेळी वाहने सावकाश व सावधपणे चालवणे, हाच एक उपाय वाटतो. पादचाऱ्यांनीही रस्त्याने सावधपणे चालावे. रस्ता ओलांडताना उजव्या-डाव्या बाजूला बघूनच पुढे जावे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध रथांवर बसणारे सेवक, भक्त तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. उत्सव असो उत्सावादरम्यान काढल्या जाणाऱ्या मिरवणुका असो, या दरम्यानच नव्हे तर नेहमीच प्रत्येक वाहनचालकाने वाहनाचा वेग कमी ठेवणे, पादचाऱ्यांनी दोन्ही बाजूंना बघून रस्ता ओलांडणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, खड्डे असलेल्या रस्त्यावरून सावकाश जाणे क्रमप्राप्त आहे. मुख्य म्हणजे प्रशासनानेही खड्डे बुजवून सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
आगामी सण-उत्सवांचा विचार व्हावा!
गणेशोत्सव असो वा आगामी काळात नवरात्रोत्सवातील मिरवणुका, दसरा, दिवाळी अथवा अन्य कोणतेही सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी महोत्सव प्रत्येक वेळी मिरवणूक काढताना रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विघ्नांचा अडथळा पार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनानेही नागरी सुविधा पुरवताना खड्डेमुक्त रस्त्यांना प्राधान्य द्यावे. सर्वांचा लाडका गणराय खड्ड्यांचे विघ्न दूर करण्याची क्षमता प्रशासनाला देवो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.