मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर
पिंपरी, ता. १ : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने निगडी, भक्ती-शक्ती चौक ते चाकण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर सादर केला. याबाबत सोमवारी (ता. १) झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित मेट्रो विस्तारीकरणासाठी लोकप्रतिनिधी व महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत फुगेवाडीतील मेट्रो कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मेट्रोकडून भक्ती शक्ती चौक-मुकाई चौक, किवळे-भुजबळ चौक, वाकड साई चौक, जगताप डेअरी-कोकणे चौक, नाशिक फाटा-संत तुकाराम नगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर, गोडाऊन चौक-चाकण या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर चर्चा झाली.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महा मेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर सहअभियंता बापू गायकवाड आदी उपस्थित होते.
चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामेट्रोमार्फत विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या विनंतीनुसार हा अहवाल महामेट्रोने महानगरपालिकेला सादर केला होता. मेट्रो विस्तारीकरणात शहरातील ठिकाणांचा समावेश आहे. या बैठकीत मेट्रोचे संरेखन (अलाईनमेंट) नाशिक फाटा-भोसरी असे करण्याबाबत विचार करावा, भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढावा, गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिकफाटा ते चाकणपर्यंत करावी व त्याची तांत्रिक पडताळणी आठ दिवसांत करावी, भुजबळ चौक येथील दोन्ही मेट्रो मार्गांची रचना प्रवाशांना सोईस्कर असावी, मेट्रो स्थानकाच्या जवळपास वाहनतळाची व्यवस्था असावी, अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.
-----------
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामेट्रोमार्फत विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी शासनास हा अहवाल पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त-प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.