औद्योगिक विकासाला हवे पाणीपुरवठ्याचे बळ

औद्योगिक विकासाला हवे पाणीपुरवठ्याचे बळ

Published on

पिंपरी, ता. २ : औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे अखंड पाणीपुरवठा. काही वेळा पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे उद्योगांवर विपरीत परिणाम होतो. यावर चिंचवड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयाने व्यवस्थापन, पाणी गळतीवर नियंत्रण आणि पुरेसा पाणीसाठा यामुळे शहर परिसरातील उद्योगांना अखंड पाणीपुरवठा करण्यात यश मिळविल्याचा दावा केला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी अपुरे पडत असल्याच्या तक्रारी उद्योजक करत आहेत.

‘एमआयडीसी’कडून रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. चिंचवड कार्यालयासाठी एकूण ९० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची परवानगी आहे. त्‍यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी, चिंचवड, तळवडे आदी औद्योगिक क्षेत्रात ३९ एमएलडी पाणी पुरविले जाते. ३० एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले जाते. याशिवाय, एमआयडीसी हद्दीबाहेरील कंपन्या व अन्य परिसरांनाही २१ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये देहू ऑर्डिनन्‍स फॅक्‍टरी, दिघी, औंध, खडकी आदी भागांतही पाणीपुरवठा केला जात आहे.

औद्योगिक क्षेत्रासोबतच नागरी भागालाही स्थिर आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा होत आहे. चिंचवड ‘एमआयडीसी’ कार्यालयाने गेल्या काही वर्षांत पाणी व्यवस्थापनासाठी शिस्तबद्ध पद्धती अवलंबली आहे. पुरेशा साठ्याचे नियोजन, गळती कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच उद्योग आणि महापालिकेला नियोजनबद्ध वाटप यामुळे पाण्याचे संतुलन राखण्यात आले आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला कोणताही अडथळा येत नसल्‍याचे अधिकाऱ्यांचे म्‍हणणे आहे. दरम्यान, भोसरी परिसरातील सेक्टर-सातमध्ये काही भागात अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

‘‘पाणीपुरवठ्याबाबत एखादी तक्रार नोंदवली गेल्यास तिचे त्वरित निरसन केले जाते,’’ असा दावा प्रशासनाने केला आहे. सध्या दीड तास पाणीपुरवठा केला जात आहे. पण, काही भागांत एक वेळच आणि तोदेखील अपुरे पाणी मिळत असल्‍याचेही उद्योजक सांगत आहेत. त्‍या ठिकाणी दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

उद्योगांसाठी पाणीपुरवठ्याची स्थिती
- एकूण नळ कनेक्‍शन : तीन हजार ५८०
- एकूण पाणी पुरवठा : ९० एमएलडी
- रावेत जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता : १२० एमएलडी

‘एमआयडीसी’ कार्यालयाकडून दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची गुणवत्तादेखील चांगली आहे. साधारण दीड तास पाणी रोज दिले जाते. मात्र, कधी-कधी कमी वेळ पाणी सोडले जात आहे. वेळेचे योग्य व्‍यवस्‍थापन हवे.
- संजय भोसले, उद्योजक, भोसरी

केवळ एक वेळ पाणी सोडले जाते. किमान दोन वेळा पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. एक वेळ पाणीपुरवठा केल्‍याने काही ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नाही. त्‍यामुळे त्‍याचे योग्य व्‍यवस्‍थापन करणे गरजेचे आहे.
- संजय सातव, उद्योजक

शहरातील औद्योगिक परिसरात पुरेसे पाणी देण्याचा आमचा प्रयत्‍न आहे. ९० एलएलडी पाणी उद्योगांसह पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी हद्दीबाहेरील कंपन्‍यांनाही पाणीपुरवठा करतो. काही तक्रारी आल्‍यास त्‍या त्‍वरीत सोडविल्या जातात.
- संजय कोटवाड, कार्यकारी अभियंता, चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com