पालिकेच्या प्रभाग रचनेवर
अकरा दिवसांत दहा हरकती

पालिकेच्या प्रभाग रचनेवर अकरा दिवसांत दहा हरकती

Published on

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जाहीर झालेल्‍या प्रारूप प्रभाग रचनेबाबत अकरा दिवसांत केवळ दहा हरकती प्राप्‍त झाल्‍या आहेत. हरकती-सूचना सादर करण्यासाठी उद्यापर्यंत (ता. ४) अंतिम मुदत देण्यात आली आहे.
महायुती, महाविकास आघाडीसह इतर पक्ष आणि इच्छुकांनी हरकती सादर केल्या नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रारूप प्रभाग रचना नकाशासह प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिका भवनाच्या आवारात तसेच, आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारातही नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना आहे. प्राप्त हरकतींमध्ये प्रभाग आठ इंद्रायणीनगर भोसरी, प्रभाग दहा शाहूनगर, संभाजीनगर आणि प्रभाग २१ मधून हरकत व सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. प्रभाग ८ मध्ये इंद्रायणी नगरला संत नगरचे नाव जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग २१ मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच आदिवासी मतदारांची संख्या असल्यामुळे त्या प्रभागाला मागासवर्गीय प्रभाग म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेची ही प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्पा नसून अभिप्रायानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिली आहे.
-------------

Marathi News Esakal
www.esakal.com