गुन्हे वृत्त
चुलत्याकडून पुतण्यावर हल्ला
पिंपरी : निगडी जुन्या भांडणातून चुलत्याने पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी महेश काळभोर (रा. समर्थ नगर, निगडी, पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तुकाराम काळभोर (रा. ६०, समर्थ नगर, निगडी) याला अटक केली. आरोपी हे फिर्यादीचे चुलते आहेत. त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास वाहने लावण्यावरून शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला. यावरून आणि जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने लोखंडी फावड्याने फिर्यादीच्या भावाच्या डोळ्यावर मारून त्याला गंभीर दुखापत केली. त्यांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली.
---------
वर्गणीच्या नावाखाली खंडणी
पिंपरी : एका लॉजच्या व्यवस्थापकाला वर्गणीच्या नावाखाली धमकी देऊन बाराशे रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार पिंपळे सौदागरमध्ये घडला. याप्रकरणी अखिलेश कुमार गौतम (रा. साईदीप लॉजिंग, पिंपळे सौदागर) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सचिन, अजय आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फिर्यादीकडे वर्गणी म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी फिर्यादीला बाराशे रुपयांची पावती देऊन ऑनलाइन पैसे पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवले नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी येण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यांनी बाराशे रुपये रोख स्वरूपात घेतले.
-----------
टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एमआयडीसी भोसरी येथील इंद्रायणी नगर रस्त्यावर दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. मोहित सेठ असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र प्रियांशु शर्मा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी विकासकुमार सेठ (रा. विकास कॉलनी, लांडेवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकांवर गुन्हा दाखल केला. भरधाव आलेल्या टेम्पोच्या धडकेत मोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
------------
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : सांगवी पोलिसांनी पिस्तूल बेकायदा बाळगल्याप्रकरणी नवी सांगवीत एका तरुणाला अटक केली. प्रभू भोसले (वय २७, रा. दांगट वस्ती, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
-----------
जुगार प्रकरणी सहा जणांना अटक
पिंपरी : पैसे लावून बेकायदा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना चिखली पोलिसांनी रामदासनगर परिसरात अटक केली. प्रतीक थिटे (वय ३४, रा. चिखली), सतीश उत्तम ढेबरे (वय ४१), आशिष मुंढे (३०), संतोष साने (४५), सचिन शेलार (४०), राजेश साने (४१, सर्व रा. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. ते स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदारित्या पैशांवर जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
-------------------------------