महापालिकेच्या ‘आयटीआय’ला विस्ताराचे पंख

महापालिकेच्या ‘आयटीआय’ला विस्ताराचे पंख
Published on

अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) विस्तार करण्यात येणार आहे. चिंचवड येथे सहा एकर भूखंडावर कंपन्यांच्या सहकार्याने अद्यावत केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) उभारले जाणार आहे. शिवाय, तेथे नवीन १५ व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षण क्षमता ७५० हून थेट १,५०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढणार आहे. परिणामी, औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाचा मोठा पुरवठा होणार आहे.

सुशिक्षित विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली. सध्या येथे १४ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. तेथील प्रशिक्षण कालावधी एक ते दोन वर्षांचा आहे. दरवर्षी ४५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर दोन वर्षांत सुमारे ७५० विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. प्रवेश क्षमता मर्यादित असली, तरी प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, अपुरा कॅम्पस आणि वर्गांच्या मर्यादेमुळे अनेकांना प्रवेश मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी संस्थेच्या विस्ताराची गरज भासत होती. यासाठी ‘आयटीआय’ संस्थेने भूखंड उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही महापालिकेकडे सादर केला होता. तो अनेक वर्षे प्रलंबित होता. अखेर प्रशासनाने चिंचवड येथील एका खासगी कंपनीची औद्योगिक भूखंडाचे निवासीकरण प्रक्रियेतील सुमारे सहा एकर सुविधा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे संस्थेच्या विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

विस्तारित इमारत अन् अद्ययावत शिक्षण
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या आधुनिक बदलांच्या पार्श्वभूमीवर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती पुरविण्यासाठी ‘आयटीआय’मध्ये नवीन १५ व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. चिंचवड येथील सहा एकरावर विस्तारित इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी काही कंपन्याही मदत करणार आहेत. या माध्यमातून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध होणार असून, औद्योगिक क्षेत्रासाठी सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी भरारी
मोरवाडी येथील ‘आयटीआय’मध्ये प्रवेश मर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी नाकारली जाते आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. अशा विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी नव्या अभ्यासक्रमांमुळे पाठबळ मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतीलच, शिवाय औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या, पुरवठादार (व्हेंडर) कंपन्या आणि उत्पादन क्षेत्रालाही कुशल मनुष्यबळाचा मोठा पुरवठा होणार आहे.

महापालिकेची ‘आयटीआय’ संस्था लवकरच अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज होणार आहे. यातून रोजगारनिर्मिती आणि स्वयंरोजगारालाही चालना मिळणार आहे. कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी


सध्या सुरू असलेले प्रशिक्षण कोर्स
एक वर्षाचे कोर्स
वेल्डर, शीट मेटल वर्कर, प्लंबर, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंन्ट.

दोन वर्षांचे कोर्स
इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशिएन, मेकॅनिक मोटर व्हेइकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ड्रॉट्समॅन (मेकॅनिकल), पेंटर (जनरल), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमन

हे नवीन कोर्स होणार सुरू
ड्रोन पायलट (ज्युनिअर), वुड वर्क टेक्निशियन, सोलार टेक्निशियन(इलेक्ट्रिकल), लिफ्ट ॲण्ड एस्कलेटर मेकॅनिक, - टेक्निशिअन मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकल, इन प्लांट लॉजिस्टिक्स ॲसिस्टंट, सर्वेअर, टूल ॲण्ड डाई मेकर ( डाई ॲण्ड मोड्युल्स), टूल ॲण्ड डाई मेकर (प्रेस टूल, जेआयजीएस ॲण्ड फिक्स्चर), आयओटी टेक्निशियन, ड्राफ्ट्समॅन सिव्हिल, हेल्थ ॲण्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर, आय.टी. (माहिती तंत्रज्ञान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com