दिव्यांगांच्या योजनांचा ‘दुहेरी’ लाभ
पिंपरी, ता. ८ : केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेकडून दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या अंतर्गत आर्थिक सहाय्य, नोकरीतील सवलती, निवृत्तीवेतन, वाहतूक सवलती आदी लाभ दिले जातात. पण, पिंपरी-चिंचवड परिसरातील काही दिव्यांग नागरिक केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा दुहेरी लाभ घेत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराचा भांडाफोड काही संघटनांनीच केला आहे.
दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थांकडून आर्थिक मदतीच्या विविध योजना राबवल्या जातात. यात प्रामुख्याने स्वयंरोजगार सुरू करणे किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दिव्यांगांना पुनर्वसन सेवा, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासह महाराष्ट्र शासन व महापालिका विविध लघु व दीर्घ मुदतीच्या योजना राबवून दिव्यांगांना आधार देतात.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र, राज्य आणि महापालिकेकडून दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. पण, एकाच लाभासाठी एकाच योजनेचा उपयोग करण्याचा नियम आहे. योग्य माहिती, पारदर्शकता आणि नियंत्रण यंत्रणा मजबूत केल्यास दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ मिळू शकतो आणि शासन निधीचा अपव्यय रोखता येईल, असे दिव्यांग नागरिकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. दुहेरी लाभ घेतल्यास शासन निधीचा अपव्यय होतो आणि इतर पात्र दिव्यांगांपर्यंत योजना पोहोचू शकत नाहीत, असेही या संघटनेच्या सदस्यांनी म्हटले आहे.
सर्व योजनांचा एकत्रित डेटाबेस तयार करावा. लाभ घेणाऱ्या व्यक्तींची माहिती पारदर्शक ठेवावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- दत्तात्रय भोसले, शहरप्रमुख, प्रहार संघटना.
---
कोट :
शहरामध्ये तिनही प्रशासनाचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवाची यादी पाठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येउन गेले आहे. याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी माहिती मागविण्यात आली आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग.
..