वाद्यांचा ठेका, गणरायाचा थाट
पिंपरी, ता. ७ : ढोल-ताशा पथकांसोबत पारंपरिक वाद्य पथकांचे दमदार सादरीकरण, त्यावर ठेका धरलेली ध्वजपथके, देवी-देवतांच्या प्रतिकृतीचे चित्ररथ, फुलांची आकर्षक सजावट केलेले रथ, त्यावरील विद्युत आतषबाजी, रोषणाई आणि रथावर विराजमान झालेले गणराय...कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिरवणूक पाहण्यासाठी उसळलेला जनसामुदाय, गुलाल-भंडाऱ्याची उधळण, लेझीम, झांज, शंखनाद पथकांची छाप आणि संबळवादनाला उपस्थितांनी दिलेली मनमुराद दाद.. गणरायाचा जयजयकार अशा वातावरणात चिंचवडमधील गणपती विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत चापेकर चौकातून ३० गणेश मंडळे मार्गस्थ झाली. बरोबर बारा वाजता ढोल-ताशांचे वादन थांबविण्यात आले. यावेळी जवळपास सात ते आठ मंडळांचे चौकात सादरीकरण होणे बाकी होते. पण, पोलिसांच्या सूचनांचे पालन करत मंडळांनी शांततेत आपल्या गणरायाचे विसर्जन केले.
चिंचवडगावातील मिरवणुकीला एक तास उशिरा सुरुवात झाली. पाच वाजता अजिंक्य मित्र मंडळाची मिरवणूक चापेकर चौकातून विसर्जनस्थळी मार्गस्थ झाली. त्यानंतर तासाभरात श्री दत्त तरुण मंडळ व चिंचवड स्टेशन येथील श्री गणेश मित्रमंडळ यांच्या मिरवणुका दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी चापेकर चौकात सद्गगुरू मित्रमंडळाचे गणराय दाखल झाले. या मंडळाने ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश दिला.
सर्वांत पुढे वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांचे पथक, त्यापाठोपाठ ‘आरंभ’ ढोल-ताशा पथकाचा ठेका पाठोपाठ जळगाव येथील नीळकंठ बँडचे वादन अशा थाटात ‘चिंचवडचा राजा’ संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाची मिरवणूक चापेकर चौकात दाखल झाली. त्यापाठोपाठ आलेल्या ज्ञानदीप मित्रमंडळाने गुलालाची उधळण केली. ‘जगदंब’ ढोल-ताशा पथक, त्यापाठोपाठ मिरवणुकीत सहभागी झालेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते, महिलांनी घातलेल्या फुगड्या, ‘माय मराठीचा गंध’ या रथात विराजमान मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य ठरले. क्रांतिवीर भगतसिंग मित्रमंडळाने यंदा ‘मयूर’ रथ साकारला होता. फुलांनी सजवलेल्या पालखीतून गणरायाची मूर्ती नेण्यात आली. या मंडळापुढे ‘शिवसंघर्ष’ ढोल ताशा-पथकाने केलेले संबळवादन आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाला भाविकांनीही प्रतिसाद दिला. ‘भोई आळीचा राजा’ उत्कृष्ट तरुण मंडळाने गणरायासमोर फुलांची उधळण केली. ‘श्री प्रतापेश्वर’ ढोल-ताशा पथकासोबतच झांज पथकही मिरवणुकीत सहभागी होते. या मंडळाने पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारली. त्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मावळे यांची वेशभूषा केलेले तरुण सहभागी होते. आदर्श तरुण मित्रमंडळाने विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानोबा-तुकोबा यांच्या प्रतिकृती असलेला ‘विठ्ठल रथ’ साकारला होता. चंदेरी पताकांची उधळण करत हे मंडळ चापेकर चौकात आले. नव गजानन मित्रमंडळ ट्रस्टने ‘राधा-कृष्ण’ रथ साकारला. कासारसाई झांज पथकाने वादन केले.
चिंचवडचा ‘दशभूजालक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी पेठ तालीम मंडळाने ‘स्वराज्य भवानी रथ’ साकारला होता. रथासमोर ‘शिवदर्शन’ ढोल-ताशा पथकाने सादरीकरण केले. तर, महिलांनी घातलेल्या फुगड्या, महिलांचे शंखनाद पथक हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. त्यानंतर घोड्यावर स्वार झालेले मल्हारी मार्तंड आणि भंडाऱ्याची उधळण, ‘वरदहस्त’ ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण हे मुंजोबा मित्रमंडळाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. फुलांनी सजवलेल्या रथातून गणरायाची मूर्ती चौकात आली. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारे फलक कार्यकर्त्यांनी झळकविले. गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्रमंडळापुढे ‘गजाक्ष’ ढोल-ताशा पथकाने सादरीकरण केले. या मंडळाची गणेशमूर्ती रथात विराजमान होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळापुढे ‘चिंतामणी’ व ‘शिवदरबार’ ढोल-ताशा पथकांनी सादरीकरण केले. फुलांनी साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी व संताची प्रतिकृती असलेला ‘संत तुकाराम महाराज रथा’त गणराय विराजमान झाले होता. हा रथ साडेदहाच्या सुमारास चौकात दाखल झाला.
उत्कर्ष मित्रमंडळाने मंदिराची प्रतिकृती साकारली होती. ‘मानाचा गणपती’ मोरया’ मित्रमंडळ-ट्रस्टने ‘शिवहनुमान’ प्रतिकृती रथ साकारला होता. या मंडळाची बालगणेशाची मूर्ती रथात विराजमान होती. तर ‘नृसिंह’ तरुण मंडळाच्या पथकातील वादकांनी चौकात ढोल-ताशाचे ठेक्यात सादरीकरण केले. मंडळाने कागदांच्या पताकांची उधळण केली. भोईर कॉलनी मित्रमंडळ- ट्रस्टने आकर्षक रथ साकारला होता. तानाजीनगर येथील समर्थ मित्र मंडळाची गणेश मूर्ती सिंहासनावर विराजमान झाली होती. झांज पथकाने मंडळापुढे कला सादर केली. समर्थ कॉलनी मित्रमंडळ ट्रस्टने पद्मनाभ मंदिर साकारले होते. ‘मृत्युंजय’ ढोल-ताशा पथकाने केलेल्या सादरीकरणावर उपस्थितांनी ठेका ठरला. त्यापाठोपाठ नवतरुण मित्रमंडळाने विद्युत रोषणाईने रथ सजवला होता. मंडळापुढे सरदार ढोल-ताशा पथकाचे वादन आणि त्यावर झेंडा पथकाने धरलेला ठेका याने वातावरण भारावून गेले. फुलांनी सजवलेला गणरायाचा रथ, श्री राम-लक्ष्मण-सीता यांच्या प्रतिकृतीचा चित्ररथ हे नवभारत मित्रमंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. ‘हिंदुगर्जना’ ढोल-ताशा पथक त्यावर झेंडा पथकाचे सादरीकरण यांचा उत्तम संगम यावेळी पाहायला मिळाला. ‘शिवोदय’ ढोल-ताशा पथकासोबतच डमरू वादन, लहानग्यांनी केलेले मल्लखांबाचे प्रात्यक्षिक त्याला उपस्थितांनी दिलेला प्रतिसाद यामुळे चापेकर चौकात चैतन्य पसरले.
शंकराच्या प्रतिकृतीचा रथ, भस्माची उधळण हे शिवाजी उदय मंडळाचे वैशिष्ट्य ठरले. त्यापाठोपाठ आलेल्या संतोषनगर मित्रमंडळाने रथात शंकराची प्रतिकृती साकारली होती. भोईराज ढोल-ताशा पथकाने सादरीकरण केले. यावेळी भस्माच्या कांड्या उधळण्यात आल्या. अष्टविनायक मित्रमंडळाने फुलांचा रथ साकारला होता. श्रीराम व हनुमानाची प्रतिकृती असलेला ‘राम रथ’ हे गावडे पार्क मित्र मंडळाचे वैशिष्ट्य होते. काळभैरवनाथ मित्र मंडळापुढे भगवा ग्रुप ढोल ताशा पथकाने वादन केले. समर्थांची प्रतिकृती असणारा ‘ब्रह्मांडनायक रथ’ या मंडळाचे आकर्षण ठरला. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ ही संकल्पना घेऊन गुलालाची उधळण करणारे ‘शिवशाही’ ढोल ताशा पथक, त्यांनी केलेले तालबद्ध वादन, त्यापाठोपाठ पारंपारिक केरळी वाद्यांचे पथक व ‘कथकली’ नृत्याचे पथक हे श्री मयुरेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. ‘ब्रह्मा’ ढोल-ताशा पथकाचे वादन व झेंडा पथकाचा ठेका, हनुमानाची प्रतिकृती असलेला रथ अशा थाटात सुदर्शन मित्रमंडळाचे गणेश रात्री पावणेबाराच्या सुमारास चापेकर चौकात दाखल झाले. त्यापाठोपाठ ओम साई मित्र चिंचवड स्टेशन आकर्षक रथ साकारला होता. आनंदनगर मित्र मंडळाने ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश दिला. बरोबर बारा वाजता चौकात आलेल्या मोरया गोसावी क्रीडांगण मित्रमंडळाचे स्वागत करण्यात आले. मंडळाने फुलांचा रथ साकारला होता.
परंपरेनुसार महापालिकेतर्फे स्वागत
मंडळांच्या स्वागतासाठी चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला. तेथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, प्रदीप जांभळे-पाटील, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही काही काळ उपस्थिती लावली. दरम्यान, आठ वाजल्यानंतर गांधी पेठ, चिंचवडगाव येथील मंडळांनी एकापाठोपाठ चौकात दाखल होण्यास सुरुवात केली.
मिरवणुकीला परंपरेचा साज
चिंचवडमधील गणेश विसर्जन मिरवणूक ही नेहमीच पारंपारिकतेसोबत सामाजिक भान जपणारी मानली जाते. याही वर्षी काही अपवाद वगळता ही मिरवणूक पारंपारिक ठरली. मराठी भाषेचा जागर करणारे चित्ररथ, ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणाऱ्या पाट्या, भक्ती-शक्तीचा संगम असणारे वारकरी व मावळ्यांची वेशभूषा केलेले पथक, दाक्षिणात्य मंदिरांच्या प्रतिकृती, फुलांमध्ये रेखाटण्यात आलेल्या संतांच्या प्रतिकृती असलेले रथ...लहान मुलांनी केलेले मल्लखांबाचे प्रात्यक्षिक हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
क्षणचित्रे
विविध ढोलताशा पथकांचे दमदार सादरीकरण
बहुतांश मंडळाकडून ‘फायरगन’चा वापर
झांज आणि लेझीम पथकांचे उत्कृष्ट सादरीकरण
रंगीत कागदी तुकड्यांची उधळण करण्यासाठी ‘पेपर शॉवर’चा वापर
अनेक वर्षांत पहिल्यांदाच मिरवणुकीत बॅंड पथक सहभागी
देवी-देवतांच्या चित्ररथांचे आकर्षण
मंदिरांची प्रतिकृती व महाकाल हे यंदाही वैशिष्ट्य
पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेतलेले कार्यकर्ते
‘ऑपरेशन सिंदूर’ची देखील झलक
- रात्री बारानंतर चापेकर चौकात पथकांकडून फटाक्यांची आतषबाजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.