गणरायाला भावपूर्ण निरोप
मंगलमूर्ती मोरया...
‘‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’’ अखंड जयघोष करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अत्यंत उत्साहाने आणि तितक्याच भक्तीमय वातावरणात गणरायाला शनिवारी (ता.६) निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत हा उत्सव सुरू होता. ढोल-ताशांचा आसमंद भेदणारा निनाद...आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई...फुलांनी सजवलेल्या रथ...लक्षवेधक आणि प्रबोधनात्मक चित्ररथ...काहींचे ऐतिहासिक, पौराणिक तसेच जिवंत व हलते देखावे, पारंपरिक वेशभूषा केलेले भाविक, फुगडीचा फेर, ढोल-ताशांच्या नादावर तरुणाईने धरलेला ठेका, रस्त्याच्या दुतर्फा दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी थांबलेले भाविक अशा वातावरणात पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातील गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. पिंपरीत पवना नदीवरील झुलेलाल घाट, वैभवनगर आणि गावठाणात उभारलेल्या कृत्रिम हौदांमध्ये मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी कॅम्प आणि गाव परिसरातील तीन मार्गांनी विसर्जन मिरवणुका निघाल्या. काहींनी पारंपरिक खेळ सादर केले. काही मंडळांनी ‘डीजे’च्या तालावर ठेका धरला. पारंपरिक वेशभूषा केलेले भाविक, फुगडीचा फेर, ढोल-ताशांच्या नादावर तरुणाईने धरलेला ठेका, त्यामुळे बहुतांश रस्ते गर्दीने फुलले होते. रात्री बारानंतरही साउंड सिस्टीम बंद करून मिरवणुका सुरूच राहिल्या. अनेक मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी केली. दहा दिवस चाललेल्या या आनंदोत्सवाच्या सांगता सोहळ्याची ही चित्रमय झलक...