गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला
पिंपरी, ता. ७ : फुलांची आकर्षक आरास, ढोल ताशांचा पारंपारिक गजर, डीजेचा खणखणाट, लायटींगच्या झगमगत्या माळा अशा वातावरणात लाडक्या गणरायाला दूर्वा वाहून आरती करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात दहा दिवसांच्या आनंदपर्वाची रविवारी (ता. ७) सांगता झाली.
दुपारी सुमारे दोन वाजल्यानंतर मिरवणुका सुरू झाल्या. पिंपरीतील मिरवणुकीत सुमारे २८ मंडळांनी सहभाग घेतला. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मिरवणुका पार पडल्या. यंदा सुमारे साडेनऊ तास मिरवणुका चालल्या.
पिंपरीत गणेश विसर्जनामुळे सकाळपासूनच प्रमुख रस्ते आणि चौक गजबजले होते. कराची चौकात महापालिका, पोलिस आयुक्तालय तसेच काही राजकीय पक्षांच्या शहर शाखांनी स्वागत कक्ष उभारले होते. तेथे मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. कराची चौकामधून दुपारी सव्वा दोन वाजता गांधीनगर येथील शिवशंकर मित्रमंडळाच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक निघाली यावेळी लेझीम पथकाने भाविकांची मने जिंकली. यानंतर फाइव्ह स्टार तरुण मित्रमंडळ आणि हर्षल मित्रमंडळाने गुलाल उधळत ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. रात्री सात वाजून दहा मिनीटांनी श्री नवचैतन्य तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा जिवंत देखावा सादर केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या वेशातील कलाकारांबरोबर अनेकांनी सेल्फी काढली. विठ्ठल-रखूमाइच्या वेशातील बालकलाकारांना पाहून भाविक हरखून गेले.
यानंतर शिवशक्ती तरुण मित्रमंडळ, ओपन चॅलेंज ढोल ताशा वादक मित्रमंडळ, कोहिनूर मित्रमंडळ, फुले मार्केटचा राजा, महेश मित्रमंडळ, मंडईचा लाल बहादूर शास्त्री मित्रमंडळ, स्वराज्य मित्रमंडळ, श्री महादेव मित्रमंडळ, एसपी मित्रमंडळ, जय भारत तरुण मंडळ, साईबाबा मित्रमंडळ, रमाबाइनगर मित्रमंडळ, १६ नंबर वॉर्ड मित्रमंडळ यांच्या पथकांचे आगमन झाले. पिंपरीत पावणे अकरा वाजता सावित्रीबाई फुले भाजी व टपरी पथारी मार्गदर्शक संघ समितीची मिरवणूक आली. यामध्ये तरुणी आणि महिलांनी फुगडी घातली.
त्यानंतर श्री गणेश मित्रमंडळ, मोरया मित्रमंडळ, श्री साई तरुण मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, न्यू स्टार मित्रमंडळ यांच्यापाठोपाठ खराळवाडीतील भागवत तरुण मित्रमंडळाच्या पथकाचे सर्वांत शेवटी रात्री ११ वाजून ४५ मिनीटांनी आगमन झाले. विविध रंगांच्या फुलांची आरास असलेल्या गणरायाच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झाले. पिंपरीत अनेक मंडळांनी दहाव्या दिवशी विसर्जन केले.
...............
बाळगोपाळांचा सहभाग
पिंपरीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ज्येष्ठांसह बाळगोपाळ उत्साहाने सहभागी झाले.
.........
तरुणांची अलोट गर्दी
गणेश विसर्जनावेळी तरुणांची अलोट गर्दी दिसून आली. मित्र, मैत्रिणींचे अनेक ग्रुप मिरवणुका बघायला आले होते. काहींनी आपल्या घरातील गणपती विसर्जनासाठी मित्र-मैत्रिणींना बोलावले होते.
.......................
विक्रेत्यांना रोजगार
भाविकांची गर्दी झाल्याने खेळणी विक्रेत्यांना चांगली कमाई झाली. बाळगोपाळांनी फुगे, चक्री, गाडी आदी खेळणी घेण्यासाठी पालकांकडे हट्ट केला त्यामुळे विक्रेत्यांच्या वस्तूंना मागणी होती.
....
रस्त्यावर फुलांचा खच
शहरातील अनेक मंडळांनी गुलालाऐवजी फुले उधळली. त्यामुळे वायुप्रदुषणाला आळा बसला. उधळलेल्या फुलांमुळे रस्त्यावर फुलांचा खच दिसून आला. लहान मुले याचा आनंद घेत होती.
...
सफाई कामगारांकडून स्वच्छता
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सतत स्वच्छता राखली जात होती. सफाई कर्मचारी परिसरात मिरवणुकीदरम्यान स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करीत होते.
...
मयुरावर गणपती आकर्षण
नव चैतन्य तरुण मंडळाच्या गणपतीने सर्वांची मने जिंकली. मयुरावर विराजमान असलेल्या गणरायासमोर सर्व कार्यकर्त्यांनी आरती सुरू केली त्यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते. लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
..
डाजे आणि लेझरचा मोठा वापर :
पिंपरीत शहरातील अनेक मंडळांनी डीजे आणि लेझरचा वापर केला होता. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेक जण लाडक्या गणरायाच्या दर्शनाला लहान बाळांना घेऊन आले होते. डीजेचा बाळाला त्रास होऊ नये म्हणून त्याचे कान झाकताना पालकांची कसरत होत होती.
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.