निरोप घेतो देवा, तुम्ही सुखी आम्हाला ठेवा !

निरोप घेतो देवा, तुम्ही सुखी आम्हाला ठेवा !

Published on

पिंपरी, ता.७ ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’ यासारख्या घोषणा देत भोसरी, इंद्रायणीनगर, रावेत, निगडी, प्राधिकरण, मोशी, किवळे, देहूरोड, मामुर्डी, जाधववाडी यासारख्या उपनगरांमध्ये गणेश मंडळांनी ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर वाजत - गाजत विसर्जन मिरवणुका काढल्या. निरोप घेतो देवा, तुम्ही सुखी आम्हाला ठेवा ! असे जणू म्हणत अबालवृद्ध भाविकांनी लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौदांना पसंती देण्यात आली.

अनंत चतुर्दशीलाही उत्साह
भोसरी ः शहराच्या भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील मंडळे, सोसायट्यांमधील गणेशाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील वाजत - गाजत विसर्जन करण्यात आले. महापालिकेने विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम हौदात गणेश विसर्जनास मंडळे आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
भोसरीतील इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरात सातव्या दिवशी अधिक प्रमाणात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे भोसरी आणि दिघी परिसरात अनंत चतुर्दशीच्या एक दिवस अगोदर गणेशाचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशीही भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील गणेश मंडळे, सोसायटी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेशाला भक्तिभावाने निरोप दिला. महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे भोसरी, इंद्रायणानगर आदींसह विविध ठिकाणी शाडूमाती आणि ‘पीओपी’च्या गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली.
गेल्या वर्षी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत उभारलेल्या कृत्रिम विसर्जन केंद्रावर २८ हजार १३० गणपती मूर्तींचे संकलन झाले होते. तर यावर्षी १९ हजार ८५९ मूर्तींचे संकलन झाले. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत आठ हजार २७१ मूर्तींचे संकलन कमी प्रमाणात झाल्याचे दिसले.

असे झाले गणपती विसर्जन

क्षेत्रीय कार्यालये/ शाडूमातीचे गणपती/ पीओपीचे गणपती/एकूण संख्या

‘क’/२,३७२/ १७,४८७/१९,८५९

‘इ’/९८४/ २०,५९१/ २१,५७५

एकूण/ ३,३५६/ ३८,०७८/ ४१,४३४

BHS25B03211


भक्ती-उत्साहाचा संगम
रावेत : रावेत येथील जाधव घाट आणि भोंडवे बाग परिसरात कृत्रिम तलावांत घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, झांज-मृदंगाचा नाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.
विविध गणेश मंडळांच्या श्रींची विसर्जन मिरवणूक सकाळपासूनच पारंपरिक पद्धतीने निघाली. रावेत भागातील अनेक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, सामाजिक संदेश देणाऱ्या विशेष रचना सादर केली. विसर्जन मिरवणुकीत युवक, महिला व लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. भक्तिमय गाणी, टाळ-मृदंग व ढोल पथकांच्या तालावर नागरिकांनी जल्लोष केला. आकुर्डी आणि प्राधिकरण परिसरातही गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ढोल-ताशांच्या तालावर मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांनी लोकांचे लक्ष वेधले. अनेक मंडळांनी महिला ढोल पथकांनाही संधी दिली. निगडी आणि यमुनानगर परिसरात पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रतिसाद देत अनेक घरगुती तसेच मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.

ठळक वैशिष्ट्ये
- जाधव घाटावर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था
- पोलिस, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्त्यांकडून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था व सुरक्षेची काळजी
- नागरिकांच्या सोयीसाठी वीज, पाण्याची सोय आणि स्वयंसेवकांची मदत
- ‘पीओपी’ ऐवजी शाडू माती मूर्ती विसर्जनासाठी प्रोत्साहन
- पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था

देहूरोडला चार तास मिरवणुका
देहूरोड/किवळे : देहूरोड, किवळे, विकासनगर व मामुर्डीत पारंपरिक ढोल-लेझीम पथकांसह तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. एकूण २५ मंडळांच्या मिरवणुका चार तास शांततेत पार पडल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.
देहूरोड, विकासनगर, किवळे व मामुर्डीतील मंडळांच्या मिरवणुकीला सायंकाळी सात वाजता प्रारंभ झाला.
देहूरोड येथे महात्मा फुले अखिल मंडई मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, नवशक्ती चैतन्य मित्र मंडळ, विशाल मित्र मंडळ; तर विकासनगर येथे बापदेव मित्र मंडळ ट्रस्ट, शिवछत्रपती तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, यंगस्टार मित्र मंडळ, शिव संदेश मित्र मंडळ, मरिमाता मित्र मंडळ, नायडू मित्र मंडळ अशा मंडळांनी सहभाग घेतला.

ठळक वैशिष्ट्ये
- दोन निरीक्षक, १४ सहाय्यक उपनिरीक्षकांसह अन्य बंदोबस्त
- किवळे-रावेत हद्दीत ‘डीजे’ मुक्त मिरवणुका
- किवळे येथील बापदेव महाराज पूल ते किवळेगाव रस्ता, पवना नदी घाट ते कातळे वस्ती मार्गे रावेत या भागात डीजेविरहित पारंपरिक मिरवणुका
- किन्हई येथील इंद्रायणी नदी, मामुर्डी येथील पवना नदी घाटावर दिवसभर गणेश भक्तांची वर्दळ

आमच्या हद्दीत ४० गणेश मंडळे असून उत्सवापूर्वी डीजे विरहीत मिरवणुका काढण्याचे आवाहन सर्व मंडळांच्या बैठकीत करण्यात आले होते. त्याला ३२ मंडळांनी प्रतिसाद दिला. लवकरच प्रत्यक्ष आभार कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
- नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
KIW25B04942

मोशीत कृत्रिम तलावांना पसंती

मोशी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात गणेश विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. अनेक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशभक्तांनी मोशीतील इंद्रायणी घाटावर जाण्यापेक्षा जवळच्या गणेश विसर्जन स्थळांवर श्रींचे विसर्जन करणे पसंत केले.
मोशीतील पवित्र इंद्रायणी नदी घाट आणि मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहा मध्ये महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलाव आणि कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडामध्ये मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी मोठ्या आकाराचा तलाव तयार करण्यात आला. तर लहान गणपतींसाठी लहान लहान कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते.

एक दृष्टिक्षेप
- मोशी, प्राधिकरण आणि इंद्रायणी घाट येथील विसर्जनाच्या ठिकाणी महापालिका, अग्निशमन दल, एमआयडीसी पोलिस बंदोबस्त
- नियंत्रण कक्ष, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रकाश योजना, मूर्ती संकलन, आपत्कालीन व्यवस्थाही सज्ज
- अविरत परिश्रम, भूगोल फाउंडेशन यासारख्या सामाजिक संस्थांकडून विविध सोयी-सुविधा देत सहकार्य
MOS25B03863

तरुणाईचा जल्लोष
जुनी सांगवी : दापोडी व पिंपळे निलख परिसरात विसर्जन मिरवणुकीत उत्साहाला उधाण आलेले पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजर, टाळ-मृदंगांच्या निनाद आणि भक्तिगीतांच्या स्वरात गणरायाला निरोप देण्यात आला. तर दुसरीकडे डीजेच्या दणदणाटात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला.
मंडळांच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांनी वातावरण भारून टाकले. दापोडी परिसरातील मुख्य मार्ग तसेच पिंपळे निलख, विशालनगर मुख्य रस्त्यावरून मिरवणुका काढण्यात आल्या. कुठे युवकांनी डीजेच्या ठेक्यावर थिरकत बाप्पाला निरोप दिला. दापोडीतील श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळ, समर्थ तरूण मंडळ, विठ्ठल तरूण मंडळ (खालील व वरील आळी), नवचैतन्य, भोलेनाथ तरूण मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, नवसम्राट मित्र मंडळ, शिवम मित्र मंडळ, एकता प्रतिष्ठान, शिवतुफान मित्र मंडळ, आम्ही समर्थ मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, अमरज्योत मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ आदी मंडळांनी गणरायाचे मिरवणुकीने विसर्जन केले.

वाजत-गाजत मिरवणुका
पिंपळे निलख येथील कै. संदेशभाऊ साठे पाटील प्रतिष्ठान (पिंपळे निलखचा राजा), श्री गणेश मित्र मंडळ (पिंपळे निलखचा विघ्नहर्ता) शिवाजी चौक मित्र मंडळ, श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, विशालनगर
विशालनगर नवविकास तरुण मंडळ, क्रांती मित्र मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, नवनाथ मित्र मंडळ,
श्री छत्रपती क्रीडा (गावठाण) मंडळ, छत्रपती युवा प्रतिष्ठान, कै.ज्ञानोबा चौंधे प्रतिष्ठान व कै. सुरेश चोंधे फाउंडेशन यांनीही वाजत गाजत विसर्जन मिरवणुका काढल्या.

PIM25B20333

जाधववाडीत ढोल-ताशांचा गजर
जाधववाडी ः जाधववाडी परिसरातील गणेश मंडळांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे विसर्जन केले. जाधववाडी, कुदळवाडी, संभाजीनगर, राजे शिवाजीनगर, आहेरवाडी येथील गणेश मंडळांसह घरगुती गणपतींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
विसर्जन मिरवणुकीत महिला, लहान मुलामुलांसहित आबालवृद्धांनी सहभाग घेतला. महिलांनी लेझीम आणि ढोल - ताशांच्या गजरात ठेका धरला. ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’, ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमला. रात्री अकरा वाजण्याच्या आधी परिसरातील मंडळांनी गणेश विसर्जनाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com