विलंबाने सुरवात, मंडळांत वाढते अंतर

विलंबाने सुरवात, मंडळांत वाढते अंतर

Published on

पिंपरी, ता. ७ ः चिंचवडमधील विसर्जन मिरवणुकीत यावर्षी पारंपारिकता, जिवंत देखावे आणि सामाजिक संदेशांचा अभाव दिसला. विलंबाने सुरवात, दोन मंडळांमधील वाढते अंतर, रात्री आठ नंतर चापेकर चौकात येण्यासाठी उडालेली झुंबड, टोलचा कर्णकर्कश आवाज, बॅंडमुळे ध्वनिप्रदूषण, मंडळांनी उधळलेले चित्रविचित्र रंग आणि वासाचे धूर असे चित्र महापालिकेच्या ढिसाळ नियोजन आणि पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे हाताबाहेर गेल्याचे विसर्जन मिरवणुकीत दिसून आले.
चिंचवडगाव, गांधी पेठ, चिंचवड स्टेशन येथून चापेकर चौकात मंडळे येत असतात. या चौकातील मिरवणुक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. महापालिकेचा स्वागत मंडपही याच चौकात असतो. महापालिकेचे कोणतेही नियोजन नसल्याने या स्वागत कक्षातही नगरसेवक, स्थानिक नेते त्यांच्या नातेवाइकांनी ठाण मांडले होते. नंतरच्या काळात गर्दी वाढल्याने व्यासपीठ कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने तसे घडले नाही. चापेकर चौक व परिसरात अग्निशामक दलाचा बंब, रुग्णवाहिका यांची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती.
बॅंडचा दणदणाट व लेझर
चिंचवडमध्ये एका मोठ्या मंडळाने आणलेल्या बॅंडच्या वादनामुळे आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठला. या बॅंडमुळे चौकातील आवाजाची नोंद १०० डेसीबलच्या पुढे गेली. लेझरमुळे नागरिकांना त्रास झाला. बहुतांश मंडळांनी गुलाल, भंडारा, भस्म यांसह विविध रंगांची उधळण केल्याने अनेक नागरिकांना व लहानग्यांना खोकल्याचा त्रास झाला. एका मंडळाने वेगळ्याच प्रकारचा धूर सोडल्याने दुर्गंधी पसरली होती.

थोडक्यात आग विझविली
बारा वाजल्यानंतर एका मंडळाने फटाके फोडल्यानंतर ठिणग्या त्यापुढील मंडळाच्या रथावर पडला. या रथाने पेट घेतला, मात्र कार्यकर्त्यांनी त्वरित आग विझविली. त्यामुळे संकट टळले. भर गर्दीत फटाके फोडले गेल्याने अनेकदा उपस्थितांमध्ये भीती निर्माण झाली. १२ वाजल्यानंतर ढोल-ताशाचे वादन थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. वादन थांबल्यानंतरही काही मंडळांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com