श्रद्धा, पर्यावरण जागरुकतेमध्ये समन्वयाचा आदर्श
पिंपरी, ता. ७ ः घरगुती गणेश विसर्जनामध्ये संस्कार, भक्तिभाव आणि पर्यावरण विषयक जागरुकता यांचा समन्वय साधत असंख्य भक्तांनी शनिवारी (ता.६) आदर्श घालून दिला. कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य वेगवेगळ्या स्वरुपात संकलित करण्यात आले.
गणरायाचा जयघोष, हलगीचा ठेका, टाळ-मृदंगाचा निनाद आणि घंटीचा नाद अशा मंगलमय वातावरणात सकाळी आठ वाजल्यापासून घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले लहानगे आणि भक्तिभावाने ओतप्रोत झालेले ज्येष्ठ नागरिक, अशा सर्वांनीच पवना नदी घाटांवर विधीवत पूजा-अर्चा, आरती आणि मंत्रोच्चारांद्वारे गणरायाचा निरोप घेतला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... या गजरात गणरायाला निरोप देताना संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेत न्हाऊन गेला. यावेळी महापालिकेच्या कृत्रिम विसर्जन कुंड आणि हौदांमध्ये मूर्ती विसर्जित करताना निर्माल्य, प्लास्टिक व इतर अवशेष वेगवेगळ्या स्वरूपात संकलित करण्यात आले.
रावेत येथील मळेकर वस्ती घाटावर रविवारी सकाळी आठ वाजता ढोल-ताशांच्या गजरात घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. या एकमेव घाटावर नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने नावाड्यांनी मूर्ती मध्यभागी नेऊन विसर्जित केल्या. शनिवारी (ता. ६) सायंकाळी चारपर्यंत एकूण ९४१ गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले.
रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील जाधव घाटावर रविवारी सकाळी आठ वाजता गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. भक्तांनी आणलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन हौदात प्राधान्याने विसर्जन केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २ हजार ३०० गणेशमूर्ती संकलित झाल्या. त्यामध्ये ४५ मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळांच्या होत्या. महापालिकेकडून मूर्ती संकलित करण्यात आल्या.
बिर्ला घाटावर विक्रमी विसर्जन
चिंचवड येथील बिर्ला घाटावर रविवारी पहाटे सहा वाजता विसर्जनाला सुरुवात झाली. वाजत-गाजत घरगुती गणेशमूर्ती तसेच काही सोसायटी व कॉलनी मंडळांच्या मूर्ती भाविकांनी घाटावर आणल्या. कृत्रिम हौदात विसर्जन करून मूर्ती महापालिकेच्या संकलन केंद्रात जमा करण्यात आल्या. दिवसभर घाटावर भाविकांची सर्वाधिक गर्दी दिसून आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५०० मूर्ती संकलित झाल्या.
पारंपारिक वेशभूषा
राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र व मोरया गोसावी मंदिर घाटावर यंदा शंभर टक्के घरगुती गणपती विसर्जनाची व्यवस्था केली. त्यामुळे लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी पारंपरिक वेशभूषेत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी घाटांवर हजेरी लावली. महापालिकेकडून दोन्ही ठिकाणी मूर्ती संकलित करून नियोजनबद्ध विसर्जन प्रक्रिया राबविण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र घाटावर ३४० तर मोरया गोसावी मंदिर घाटावर ४५० घरगुती गणेशमूर्ती संकलित झाल्या.
कृत्रिम हौद नावालाच ?
महापालिकेने गणेश भक्तांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी विसर्जन हौद तयार केले. मात्र, बहुतांश हौदाच्या ठिकाणी प्रशासनाकडून सुविधा न मिळाल्यामुळे गणेश भक्तांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सांगवी येथील दत्त आश्रम परिसरातील विसर्जन हौदात दोन फूट अस्वच्छ पाणी होते. अशा पाण्यात गणेश विसर्जन करणे शक्य नसल्याची नाराजी व्यक्त करत नागरिकांनी अन्य ठिकाणी गणरायाचे विसर्जन केले. याठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि गैरसोय निर्माण झाली.
क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलित निर्माल्य
आकडेवारी ७ सप्टेंबर २०२५ पासून
अ क्षेत्रीय कार्यालय - १८.८१ टन
ब क्षेत्रीय कार्यालय - ४८.७७ टन
क क्षेत्रीय कार्यालय - २६.४६ टन
ड क्षेत्रीय कार्यालय - २७.४३ टन
इ क्षेत्रीय कार्यालय - ३२.१६ टन
ग क्षेत्रीय कार्यालय - १६.२३ टन
फ क्षेत्रीय कार्यालय - २५.५२ टन
ह क्षेत्रीय कार्यालय - २०.३० टन
एकूण - २१५.७० टन
मूर्ती संकलन प्रभागनिहाय आकडेवारी
अ प्रभाग : ६,५९१
ब प्रभाग : ३९,९३९
क प्रभाग : १९,८५९
ड प्रभाग : ८,१७१
ई प्रभाग : ६,४४६
फ प्रभाग : १७,४९०
ग प्रभाग : ७,१७५
ह प्रभाग : ६,०६२
एकूण : १,११,७२९
पर्यावरणपूरक मूर्ती : २०,७२८
पीओपी मूर्ती : ९१,००२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.