रामा ग्रुपच्या संचालकांसह १९ जणांवर गुन्हा
पुणे, ता. ७ : ताथवडे येथील ३६ हेक्टर जमिनीच्या वादातून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी रामा ग्रुपचे मोती पंजाबी यांच्यासह १९ जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी राहुल अरोरा यांनी फिर्याद दिली. त्यावरून मोती पंजाबी, राजू पंजाबी, जितेंद्र पंजाबी, नरेश पंजाबी, नीलेश श्रीकांत जोशी, दत्तात्रय पिंगळ, लक्ष्मण कटारिया, बादल घस्ते, किरण थत्ते, उदय थत्ते, महेश गाडगीळ, विशाल आल्हाट, धनंजय लेले, प्रियंवदा मराठे, श्रीराम मराठे, सौमित्र मराठे, प्रकाश छाजेड, अभिजित काटे, संदीप पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
ताथवडेतील ३६ हेक्टर ४२ आर जमीन १७६९ मध्ये पेशवे सरकारने नारायण विश्वनाथ भट (थत्ते) यांना इनाम स्वरूपात दिली होती. १९५३ मध्ये इनाम अबोलिशन कायद्याखाली सरकारने ती जमीन ताब्यात घेतली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेतून थत्ते कुटुंबाच्या नावावर जमिनीचा हक्क आला. पुढे राजीव अरोरा यांनी यातील तब्बल ३४ हेक्टर ३५ आर जमीन विकत घेतली होती. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीररीत्या पार पडला होता. परंतु या सर्वांनी बनावटपणे हिस्सा दाखवून एलिफंटा रिअॅल्टीबरोबर (रामा ग्रुप) व्यवहार केला. त्यात काहीच तथ्य नसतानाही खोटे कागद दाखवून जमीन विक्रीचा करार करण्यात आला. त्यावर ताबा मिळवण्यासाठी गुंडांना मैदानात उतरविण्यात आले, असे फिर्यादी अरोरा यांचे म्हणणे आहे.
अरोरा कुटुंबाने आपल्या जमिनीवर सुरक्षारक्षक नेमून कुंपण घातले होते. परंतु जमिनीवर वाद दाखवून बनावट दावे उभे करण्यात आले आणि त्याचाच फायदा घेत रामा ग्रुपच्या पंजाबी भावंडांसह इतरांनी गुंडांच्या टोळ्यांमार्फत जमिनीचा ताबा घेण्याचा कट रचला, असेही त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वर्धमान डेव्हलपर्सचे प्रकाश छाजेड यांच्यासोबतही जमिनीच्या विक्रीचे व्यवहार झाले. सात-बारा उताऱ्यावर नावे कमी झाली नसतानाही त्याचा गैरफायदा घेऊन दावे दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रियवंदा मराठे, श्रीराम मराठे, सौमित्र मराठे हे सुद्धा सामील असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
---
पुणे पोलिस आयुक्तांचे लक्ष
या प्रकरणात सॉफ्टवेअर कंपनी मालक राहुल अरोरा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांची तक्रार गांभीर्याने घेत पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी लक्ष घातले आणि आर्थिक गुन्हा शाखेकडे तपास सोपविण्यात आला.
---
जमिनी आणि गुन्हेगारीकरण
मावळ व पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. भूमाफिया व बिल्डर लॉबीने थेट गुंडांच्या सहाय्याने जमीन बळकावण्याचे प्रकार सुरु केले आहेत. जमीन बळकावण्यासाठी बनावट दस्त, खोटे दावे आणि टोळ्यांची मदत घेऊन केलेली फसवणूक उघड होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.