प्रारूप प्रभाग रचनेत बदल होणार का?
पिंपरी, ता ९ ः महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ३१८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यांवर बुधवारी (ता. १०) सुनावणी होणार आहे. विशेषतः प्रभाग एक, १० आणि २९ बाबत सर्वाधिक अनुक्रमे ९८, ११५ व ३१ अशा २४४ हरकती आहेत. त्यातील बहुतांश एकसारख्या असल्याने सुनावणीनंतर प्रारूप प्रभाग रचनेत बदल होणार की आहे तशीच रचना राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. त्यावर प्राप्त ३१८ हरकती व सूचनांवर बुधवारी (ता. १०) दुपारी एक ते चार या वेळेत चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट सभागृहात सहकार व पणन विभाग प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर सुधारित प्रारूप प्रभाग रचना सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.
सुनावणीचे वेळापत्रक
वेळ / हरकतींची संख्या
दुपारी १ / १०६
दुपारी २ / ७०
दुपारी ३ / ११५
दुपारी ४ / २७
दृष्टिक्षेपात हरकती
प्रभाग १ ः ८६ व १२ अशा ९८ हरकती एकसारख्या
प्रभाग १० ः ५२, ३८ व २२ अशा ११२ हरकती एकसारख्या
प्रभाग २० ः २९ हरकती एकसारख्या
एकूण ः ३१८ पैकी २३९ हरकती एकसारख्या असून ७९ हरकती व सूचना महत्त्वाच्या आहेत
प्रभाग ः ५, १३, १५ ते १८, २५, २७, २८ या नऊ प्रभागांतून एकही हरकत नाही
---