अवजड समस्येवरील उपाय बोजड
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ ः शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर विशिष्ट वेळेत बंदीचा उपाय काढला आहे. तीन शहरांतील वेळा वेगवेगळ्या असणे वाहतूक कंपन्यांसह ट्रकचालकांना गैरसोईचे ठरले आहे. त्यामुळे माल उत्पादन तसेच मालवाहतूक अशा दोन्ही कंपन्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी घातली आहे. मुंबई, ठाणे, तळेगाव आणि लोणावळा या शहरांमध्येही अशी बंदी घालण्यात आली आहे. सर्व ठिकाणी बंदीच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रत्येक शहराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबणे भाग पडते किंवा पर्यायी मार्गाने जावे लागते. अनेक ठिकाणी पर्यायी रस्त्यांची रुंदी कमी असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी त्यांना तासन््तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जात आहे.
------
हमालही उपलब्ध नाहीत
मुंबईतून निघालेले वाहन पुण्यात येईपर्यंत बंदीची वेळ झालेली असते. दुसरीकडे पुण्यातून निघालेले वाहन मुंबईकडे जाईपर्यंत तेथे बंदीची वेळ झालेली असते. त्यामुळे वाहनचालकांना शहराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक थांबावे लागते किंवा पर्यायी मार्गाने जावे लागते. काही वेळेस माल जेथे पोचवायचा आहे, त्या ठिकाणी जाईपर्यंत रात्र झालेली असते. रात्री माल खाली करण्यासाठी आणि भरण्यासाठी हमाल, कामगार उपलब्ध नसतात. त्यामुळे रात्रभर थांबून सकाळी माल भरून निघावे लागते. तोपर्यंत पुन्हा बंदीची वेळ झालेली असते. त्यामुळे एकच भाडे घेऊन यायला दोन-दोन दिवस जात असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले.
---------
चालकांच्या आरोग्यावर परिणाम !
पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोणावळ्यासह मुंबईतही अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेस बंदी घातली आहे. प्रत्येक शहरात अवजड वाहनांना वेगवेगळ्या वेळेस बंदी असल्यामुळे चालकांना नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते. दिवसा बंदी असल्यामुळे रात्री वाहन चालवावे लागते. बऱ्याच वेळा ते थांबत असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा, झोपण्यासाठी जागा, अंघोळीसाठी जागेसह इतर सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते.
----------
बंदी हा एकमेव पर्याय ?
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांची कमी पडत असलेले रुंदी यामुळे वाहतूक कोंडी वाढतच पडत आहे. नवीन रस्ते, रस्त्यांच्या कडेचे झालेले अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, पर्यायी व्यवस्था उभारणे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असताना. वाहतूक कोंडीला प्रत्येक वेळेस अवजड वाहनांना जबाबदार धरुन सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस प्रत्येकी पाच तास शहरात येण्यास बंदी घालतात. वाहतूक शाखेने देखील केवळ अवजड वाहनांवर बंदी न घालता पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी वाहतूक संघटनांकडून होत आहे.
------
अवजड वाहनांवरील बंदीमुळे सकाळी आणि सायंकाळी तीन ते चार तास वाहने शहराबाहेर उभी करावी लागतात. परिणामी वाहने वेळेवर येत नसल्याने पुढील भाडे घेता येत नाही. वाहने वेळेवर माल पोहचवू शकत नसल्याने बऱ्याच वेळा कंपन्याही दिलेले भाडे रद्द करतात. त्यामुळे ट्रान्स्पोर्ट कंपन्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
- अनुज जैन, सचिव, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन पुणे
-----
वाहतूक शाखेने अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. हा एकतर्फी निर्णय झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे ट्रान्स्पोर्ट कंपन्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. चौकाचौकात वाहतूक पोलिस वाहनांची छायाचित्रे काढून दंड ठोठावत आहेत. त्यामुळे दुहेरी नुकसान होत आहे. अवजड वाहनांवर बंदी घालण्याऐवजी शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत.
- प्रमोद भावसार, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉँग्रेस
-----
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण विविध उपाययोजना करत आहोत. अवजड वाहतूक बंदी हा त्यातील एक पर्याय आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागले.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
-----
मुंबईत ः
सकाळी ८ ते १२, सायंकाळी ५ ते ९
पिंपरी चिंचवड शहर ः
सकाळी ८ ते १२, सायंकाळी ४ ते ९
पुणे ः
सकाळी ६ ते ११, सायंकाळी ५ ते १०
-----------
मालवाहतूक वाहने
वाहनांचा प्रकार ः पुणे ः पिंपरी चिंचवड
तीन चाकी ः १३,४०७ ः ७,४७०
इतर वाहने ः १,४७,७९८ ः १,१९,२६६
ट्रेलर ः १,१९५ ः ३८०
-----