‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत 
फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण

‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण

Published on

पिंपरी, ता. ९ ः महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यातर्फे ‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत मोरवाडीतील नाना-नानी पार्कमध्ये फेडरेशन लीडर्ससाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. समाजसेवक विशाल शेडगे, सक्षमा प्रकल्प संचालक सचिन उपाध्ये यांच्यासह उडान (प्रभाग ब), आरंभ (प्रभाग ड) आणि झेप (प्रभाग ई) या तीन फेडरेशनमधील २६ महिला लीडर्स, तसेच झोनल सोशल वर्कर्स आणि फील्ड कोऑर्डिनेटर्स सहभागी झाले. गणपती नांगरे (क्षमता बांधणी प्रमुख) यांनी प्रशिक्षणाचा उद्देश समजावून सांगितला. फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण अंतरंगातून नेतृत्व करणे, अंतर्मनाचा आवाज स्वीकारणे, इतरांचे नेतृत्व करणे, भविष्य घडवणे, लैंगिक समतोल अर्थसंकल्प तसेच लैंगिक समानता प्रशिक्षण आदींचा प्रशिक्षणात समावेश होता.
‘अंतरंगातून नेतृत्व करणे’ विषयावर प्रशिक्षण देताना माझे नेतृत्वगुण, वाचक शब्द, चांगला नेता कसा असावा?, जुन्या कल्पना मोडणे, तुमचा आवाज शोधणे, खंबीरपणे उभे राहणे या घटकांचा समावेश होता. प्रास्ताविक सचिन उपाध्ये यांनी केले. सूत्रसंचालन निशा निमसे यांनी केले.

महिलांनी शिक्षण सुरू ठेवावे, नेतृत्वगुण विकसित करावेत, वैयक्तिक व सामाजिक विकासाकडे लक्ष द्यावे, यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरतात. या माध्यमातून महिलांना स्वत:मधील गुण वृद्धिंगत करण्यास मदत होते.
- ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका
---

Marathi News Esakal
www.esakal.com