वाहतूक बेटाचा प्रयोग वाहनचालकांच्या मुळावर
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ ः शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी) महापालिकेने केलेला वाहतूक बेटाचा प्रयोग वाहनचालकांच्या मुळावर उठला आहे. चौकाच्या चारही रस्त्यांवर एक किलोमीटर रांगा लागत आहेत. महापालिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांची गैरसोय होत असतानाही महापालिकेने ठेकेदारांसाठी वाहतूक बेट उभारल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोरवाडी चौकातून पिंपरी गाव, चिंचवड, नेहरू नगर, लांडेवाडी, भोसरी, मोशीकडे जाता येते. हा चौक अतिशय वर्दळीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या चौकात सतत वाहतूक कोंडी होत आहे. चौकातच दोन ते तीन मोठी आस्थापने आहेत.
दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. खरेदीसाठी येणारे नागरिक मेट्रो खाली असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग करत आहेत. रिक्षा आणि खासगी वाहने देखील रस्त्यावरच उभी केली जात आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे दिसून येते. शहरी पथ धोरणांतर्गत पदपथ विकसित केल्यामुळे आणि मेट्रो स्थानकांमुळे अगोदरच रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात आता महापालिकेने मोरवाडी चौकात वाहतूक बेट उभारण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी रस्त्यावर ब्लॉक आणि रिफ्लेक्टर लावले असल्याने वाहनास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे.
वाहतूक बेट उभारण्यावर नागरिकांनी हरकत घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी देखील वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली असून याला विरोध केला आहे, मात्र वाहतूक पोलिसांचा विरोध झुगारून पालिका प्रशासन ते उभारण्यावर ठाम असल्याचे दिसून येते.
---------------
पालिकेकडून मोरवाडी चौकात वाहतूक बेट उभारण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ब्लॉक टाकून वाहतूक नियोजन होते का ? हे तपासण्याचे काम सुरु आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल केले जाणार आहे.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
-----