मूलभूत प्रश्न प्रलंबित; 
सुविधा केवळ कागदावरच

मूलभूत प्रश्न प्रलंबित; सुविधा केवळ कागदावरच

Published on

प्रभाग क्रमांक ३२ : सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर, पीडब्ल्यूडी, एस. टी कॉलनी


पिंपरी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ मधील नागरिक गेली अनेक वर्षे मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना आणि विकासकामांच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र कचरा व्यवस्थापनापासून ते पाणीपुरवठा, वाहतूक आणि आरोग्य सुविधांपर्यंत अनेक गंभीर समस्या अद्याप प्रलंबित आहेत.

प्रभागातील मध्यवर्ती भागात ७६ गाळ्यांची भाजी मंडई बांधून तयार आहे. मात्र गाळे घ्यायला व्‍यापाऱ्यांचा नकार, आतील‍या बाजूला गाळे असल्‍याने गेली तब्बल २० वर्षे ही मंडई धुळखात पडून आहे. या मंडईचा वापर होत नाही. त्‍यामुळे या परिसरात अस्वच्छता वाढली आहे. अनेकदा नागरिकांना दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. या बरोबरच प्रभागात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नियमित घंटागाडी प्रभागात फिरत नाही. कचरा संकलनाची व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून राहत आहे. परिणामी नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. मोठ्या पावसात जलकोंडी नित्याची झाली आहे. मुळा-पवना नदीकाठावर दोन्ही बाजूंनी झालेला भराव, अनधिकृत बांधकामे आणि तुंबलेली सांडपाणी वाहिनी यामुळे पाणी साचून राहते. परिणामी वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या घरातही पाणी शिरण्याचे प्रकार घडतात.

मुळा नदी किनाऱ्यावरील सांगवी-बोपोडी पुलाचे सेवा रस्ते व जोड रस्त्यांचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. मधुबन सोसायटीचा डीपी रस्ताही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या अपूर्ण रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संविधान चौक ते माहेश्वरी चौक आणि संविधान चौक ते सांगवी फाटा या रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग होत आहे. परिणामी रस्ता अरुंद झाला असून, रहदारीसाठी तो अपुरा पडत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी असून कमी दाबाने आणि दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सांगवी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याची कसरत अधिकच तीव्र होते.

प्रभागातील वेताळ महाराज उद्यान, संत गोरोबा कुंभार उद्यान आदी उद्याने इतर भागांच्या तुलनेत दुर्लक्षित व बकाल अवस्थेत आहेत. स्मार्ट सिटीची घोषणा असताना बसथांबे मात्र मोडकळीस आलेले असून, प्रवाशांना पावसात व उन्हात उघड्यावर उभे राहावे लागते. आरोग्य सुविधा बाबतीतही परिस्थिती समाधानकारक नाही. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिका दवाखान्यात जागा अपुरी असून, दवाखान्याच्या विस्तारीकरणाची नितांत गरज आहे. पुण्याच्या धर्तीवर मुळा नदी घाटांचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. नदी सुधार प्रकल्प, कचरा संकलन केंद्र, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि खंडित वीजपुरवठ्याच्या कायमस्वरूपी समस्यांवर उपाययोजना यांसारखी कामे अद्याप मार्गी लागलेली नाहीत.

चतुःसीमा
पूर्वेला : पवना नदी. दत्‍त आश्रम
पश्चिमेला : लष्करी हद्द, शितोळे रस्ता. कृष्णानगर
उत्तरेला : पिंपळे गुरव रस्‍ता
दक्षिणेला : मुळा नदी. ढोरेनगर, श्री आय्याप्‍पा स्‍वामी मंदिर. मधुबन सोसायटी

या आहेत समस्या
- भाजी मंडई बांधूनही वापराअभावी धुळखात
- वाहतुकीचा बोजवारा
- नियमित कचरा संकलनाची व्यवस्थेचा अभाव
- लोकसंख्येच्‍या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा
- उन्‍हाळ्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता
- मोडलेल्‍या बसथांब्यांमुळे प्रवाशांना उन्‍हाचा त्रास

कुठे? काय?
- संविधान चौक ते माहेश्वरी चौक आणि संविधान चौक ते सांगवी फाटा या रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग
- मुळा-पवना नदीकाठावर दोन्ही बाजूंनी झालेला भराव, अनधिकृत बांधकामे आणि तुंबलेली सांडपाणी वाहिनीचा नागरिकांना त्रास
- वेताळ महाराज उद्यान, संत गोरोबा कुंभार उद्यानाची दुरवस्‍था
- मुळा नदी घाटांचे सुशोभीकरण रखडले
- सांगवी–बोपोडी पुलाचे सेवा रस्ते व जोड रस्त्यांचे रुंदीकरण प्रलंबित
- मधुबन सोसायटीचा डीपीचा प्रश्‍न सुटेना

असे आहेत मतदार
- पुरुष : २०४५३
- महिला : १९५२८
- इतर : ०
- एकूण मतदार : ३९९८११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com