पहिल्या टप्प्यात लढतीचे चित्र स्पष्ट
पिंपरी, ता. २८ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले) युती जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जागावाटप घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आजवर निर्णय लांबत राहिल्याने संभ्रमात असलेल्या इच्छुकांच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सुरू करत मैदानात उतरल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भाजप-शिवसेना-रिपाइं युतीचा निर्णय होत नसल्यामुळे ३२ प्रभागांतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची चिंता वाढली होती. भाजपच्या इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब लागल्याने संभ्रम कायम राहिला होता. युतीची आशा बाळगून थांबलेल्या शिवसेना आणि रिपाइंच्या इच्छुकांसमोरील लढतीचे चित्र अस्पष्टच होते. त्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये युती, की स्वतंत्र लढत, याबाबतच्या निर्णयाची उत्सुकता निर्माण झाली होती.
मागील निवडणुकीत ज्या प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले किंवा द्वितीय क्रमांकावर राहिले, त्या जागा सोडण्यास भाजप पदाधिकारी तयार नव्हते. तर, रिपाइंने क्षमतेपेक्षा अधिक जागांची मागणी केल्याने त्या मान्य करण्याचा प्रश्न भाजपासमोर निर्माण झाला होता. मात्र अखेर चर्चेअंती भाजप, शिवसेना आणि रिपाइंच्या नेत्यांनी तोडगा काढला. त्यामुळे युती ‘फिक्स’ झाल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे.
जागा वाटपाबाबत ‘सस्पेन्स’
युती ठरली असली, तरी शिवसेना आणि रिपाइंला किती प्रभागांतील किती जागा सोडण्यात आल्या, याबाबत रविवारी रात्रीपर्यंत अधिकृत स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून आले. तथापि, युतीमध्ये भाजपला सर्वाधिक १११, शिवसेना-१४ आणि रिपाइं ३ जागा देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याची चर्चा आहे. या बाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, नेमके कोणते प्रभाग आणि त्या प्रभागांतील किती जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या, हे युतीची जाहीर घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष
युतीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने सुरुवातीला ३२ जागांची मागणी केली, तर रिपाइंने अनुकूल असलेल्या प्रभागांतील १५ जागांची मागणी पुढे केली होती. काही विशिष्ट प्रभागांमध्ये शिवसेनेला पुरुष आरक्षणाच्या जागा सोडण्याची अपेक्षा होती; मात्र त्या जागा देण्यास भाजप नेते तयार नव्हते. या मुद्द्यावरून चर्चा ताणली गेली होती. अखेर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून सखोल चर्चेअंती तोडगा काढल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेला १४ जागा तर, रिपाइंला अधिकृतपणे तीन जागा देण्याची तयारी भाजपाने दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

