मद्यपान करून वाहन चालवल्यास परवाना निलंबित
पिंपरी, ता. २९ : नववर्ष स्वागतावेळी ३१ डिसेंबरसह एक जानेवारीच्या मध्यरात्री अनेकजण बेधुंद अवस्थेत वाहने चालवतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागानेही (आरटीओ) नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या वायुवेग पथकामार्फतही महामार्गांवर तपासणी केली जाणार आहे. यात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासह वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी अनेक जण आतुरलेले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरासह लोणावळा आणि मावळ परिसरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल्सचालकांनी डीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. तरुण-तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. दोन जणांसाठी दीड हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचे पास दिले आहेत. यामध्ये जेवण, शीतपेय आणि मद्य दिले जाणार आहे. नववर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर बेधुंद होऊन तरुण-तरुणी वाहने चालवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. हे रोखण्यासाठी आरटीओची दोन पथके ३१ डिसेंबरच्या रात्री आणि एक जानेवारीच्या मध्यरात्री वाहनांची तपासणी करून वाहन चालकांची तपासणी करणार आहेत. तसेच ट्रिपल सीट, सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट नसणे, अतिवेगाने वाहन चालविणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
असा आहे कायदा
मोटर वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये मद्यपान करून वाहन चालवणे दंडनीय अपराध आहे. या प्रकरणात चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला जातो. मद्यपान करून वाहन चालविताना पकडल्यास पहिल्यांदा १० हजार रूपये दंड तर दुसऱ्या वेळास पकडल्यास १५ हजार रूपये दंडाची तरतूद आहे. त्याबरोबरच वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्याची तरतूद आहे.
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या आणि काळी काच असलेल्या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक विभागाने २० डिसेंबर पासून विशेष मोहीम राबविली आहे. २८ डिसेंबरपर्यंत मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या ३६५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर काळी काच असणाऱ्या एक हजार १५६ वाहन चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही मोहिम पुढील काही दिवस सुरुच राहणार आहे.
- विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड
नववर्ष स्वागत पार्श्वभूमीवर आरटीओचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याद्वारे महामार्गांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
-----------

