फुलांचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्ग पुन्हा अडचणीत
सोमाटणे, ता. २९ ः फुलांचे बाजारातील भाव कोसळल्याने शेतकरीवर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीने पवनमावळ पूर्व भागातील गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, कुसगाव, पाचाणे, चांदखेड परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे नुकसान झाले होते.
सततच्या पावसाने फुले भिजत राहून खराब झाली होती. पाऊस उघडल्यानंतर पावसाच्या माऱ्यातून जे तरले त्यांना चांगले बाजारभाव मिळाले होते. त्यातच लग्नसराई, निवडणुका यामुळे फुलांना मागणी वाढून भाव अचानक वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत होता, परंतु ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. सध्या भाव कोसळले असून झेंडूचा बाजारातील भाव किलोला तीस ते चाळीस रुपयांवर आला आहे. शेवंती व अस्टर ५० ते ७० रुपये, तर गुलछेडीचाही भाव निम्यावर आला आहे. फुलांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या नफा होण्याच्या आशा मावळल्या आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड फूल मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजुकुमार बोडके यांनी दिली.
----------------------------------------------------
फोटो आयडी
80693

