पिंपरी नवीन वर्षात नवे प्रकल्प
औद्योगिकनगरी संगतीला; नवीन प्रकल्प दिमतीला
नवीन वर्षातील स्थिती; कामे सुरू असल्याने प्रकल्प कार्यान्वित होणार
पिंपरी, ता. ३१ ः नवीन वर्ष २०२६ पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी नवीन प्रकल्प कार्यान्वित करणारे ठरणार आहे. यामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रो सेवा, पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल, महापालिकेसाठी पर्यावरणपूरक बहुमजली इमारत, मोशीतील मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, थेरगावमधील कर्करोग उपचार रुग्णालय, चिंचवडमधील जळीत रुग्ण उपचार कक्ष, वाकडमधील बाणेर जोडणारा मुळा नदीवरील पूल, सांगवी-किवळे बीआरटी मार्गावरील रक्षक चौकातील भुयारी मार्ग, दापोडी- फुगेवाडीसाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा, भामा-आसखेड प्रकल्पातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाणी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
पिंपरी-निगडी मेट्रो मार्गिका
स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो मार्गाचा विस्तार निगडीतील भक्तीशक्ती चौकापर्यंत नियोजित आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असून, सर्व खांब उभारून झाले आहेत. त्यावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. सुमारे साडेचार किलोमीटर अंतराच्या या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ, टिळक चौक निगडी अशी स्थानके असतील. भक्तीशक्ती चौकात टर्मिनल असेल. येथून पुढे किवळे, वाकड, पिंपळे सौदागर, भोसरी, मोशीमार्गे चाकण पर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी मार्गिकेमुळे चिंचवड, आकुर्डी, निगडीसह थेरगाव, निगडी-आकुर्डी प्राधिकरण, तळवडे, चिखली, संभाजीनगर, शाहूनगर परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे. शिवाय, या मार्गावरील तीन स्थानकांशी पीएमपीची फिडर बससेवा कनेक्ट केली जाणार असल्याने मार्गाच्या दोन्ही कडील उपनगरांतील नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी, वाघोली, कर्वेरोड, कोथरूड, स्वारगेट, कात्रज भागात जाणे सोईचे होणार आहे.
डेअरी फार्म उड्डाणपूल
मुंबई-पुणे लोहमार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. त्यांना जोडण्यासाठी बिजलीनगर, चिंचवड स्टेशन, पिंपरी कॅम्प, नाशिक फाटा, दापोडी आदी ठिकाणी उड्डाणपूल उभारले आहेत. आकुर्डी स्टेशन, साई चौक पिंपरी, शंकरवाडी कासारवाडी, सिद्धार्थनगर दापोडी येथे भुयारी मार्ग आहेत. दापोडीतील मंडई, कासारवाडी येथे फाटके आहेत. पिंपरी डेअरी फार्म येथेही फाटक होते. मात्र, रेल्वे गाड्यांच्या वेळेत अनेकदा फाटक बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे तिथे लोहमार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले होते. गेल्या वर्षापासून त्याचे काम सुरू आहे. सध्या ९० टक्के काम झाले असून, केवळ लोहमार्गावर पूल उभारणे बाकी आहे. २०२६ मध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन पूल रहदारीस खुला होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई महामार्गाशी पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आदी भाग जोडला जाणार आहे. यामुळे वेळ आणि आर्थिक बचत होणार आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी पुलाचा फायदा होणार आहे.
रक्षक चौकातील भुयारी मार्ग
सांगवी-किवळे बीआरटी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपळे निलख येथील रक्षक चौकात भुयारी मार्ग उभारला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पुणे, औंध, रावेत, किवळे, वाकड, हिंजवडी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सिग्नल-फ्री चौक होणार आहे. शिवाय जलद प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पात भुयारी मार्ग व त्यावरील उड्डाणपूल असेल. बीआरटी मार्ग आणि पुणे-सांगवी-औंध व वाकड-रावेत- मुंबईकडे येण्या-जाण्यासाठी उड्डाणपूल उपयुक्त ठरणार आहे. तर, पिंपळे निलखकडून पुण्याकडे जाण्यासाठी व काळेवाडी फाट्याकडून येऊन पिंपळे निलखला जाण्यासाठी आणि लष्करी आस्थापनाकडून मुंबईकडे जाण्यासाठी व पुण्याकडून लष्करी आस्थापनाकडे जाण्यासाठी व तेथून मुंबई व पिंपळे निलखकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचून इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे बीआरटी मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे.
अन्य प्रकल्पांचे फायदे
- महापालिकेसाठी पर्यावरणपूरक बहुमजली इमारत ः ऑटो क्लस्टरसमोर महापालिका मुख्यालयासाठी पर्यावरणपूरक १६ व १८ मजली उंच जोड इमारती उभारण्यात येत आहेत. त्यांचे ८० टक्के काम झाले असून, महापालिकेचे सर्व विभाग एकाच ठिकाणी राहणार आहेत.
- मोशीतील मल्टिस्पेशालिटी रुग्णालय ः मोशीमध्ये ७५० खाटांची क्षमता असलेले मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू होणार आहे. तिथे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचेही नियोजन आहे. यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व डॉक्टरांची संख्या वाढणार आहे.
- थेरगावमधील कर्करोग उपचार रुग्णालय ः महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाशेजारील जागेत कर्करोग निदान व उपचार रुग्णालय प्रस्तावित आहे. कर्करुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील रुग्ण व नातेवाइकांचीही सोय होणार आहे.
- अन्य प्रकल्प ः चिंचवडमधील तालेरा रुग्णालयात जळीत रुग्ण उपचार कक्ष, वाकड व बाणेर जोडणारा मुळा नदीवरील पूल, दापोडी-फुगेवाडी भागात थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा, भामा-आसखेड प्रकल्पातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाणी आदी प्रकल्पही नवीन वर्षात कार्यान्वित होणार आहेत.
नवीन वर्षात अपेक्षित कामांना मुहूर्त
- निगडी- किवळे- पुनावळे- ताथवडे- वाकड- पिंपळे सौदागर- नाशिक फाटा- भोसरी- मोशी- चाकण मेट्रो मार्ग
- मुंबई-बंगळूर महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) सेवारस्ता रुंदीकरण व एलिव्हेटेड करणे
- पुणे-नाशिक महामार्ग नाशिक फाटा ते राजगुरूनगरपर्यंत रुंदीकरण व एलिव्हेटेड करणे
- दापोडी ते किवळे लोहमार्गाला आणि तळवडे ते चऱ्होली इंद्रायणी नदीला समांतर रस्त्यांची कामे
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

