निवडणूक प्रचाराच्या नावाखाली प्रदूषणात भर

निवडणूक प्रचाराच्या नावाखाली प्रदूषणात भर

Published on

पिंपरी, ता. ३१ : एका बाजूला शहराची हवेची गुणवत्ता ही प्रदूषित गटात पोचली आहे. त्यातच निवडणूक प्रचारासाठी वाहनांची रॅली, फटाक्यांचा वापर यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे किमान निवडणूक काळात तरी उमेदवारांनी पर्यावरणाचे भान जपून प्रचार करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करत आहेत.
महापालिका निवडणुकांमुळे शहरातील वातावरण गरम आहे. नुकतीच सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर केली असून प्रचारही सुरू झाला आहे. मात्र, शहरातील वाढते प्रदूषण पाहता निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये फटाके फोडण्याच्या उत्साह उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांनी आवर घालणे गरजेचे आहे. निवडणुकीचा कोणताही कार्यक्रम फटाके व गुलालाशिवाय पूर्ण होत नाही. अगदी उमेदवारी मिळाल्यापासून, प्रचाराच्या सभा, पदयात्रा यासाठी फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. निकालाच्या वेळी गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा करण्याचे प्रमाण मोठे असते. हे सर्व घटक शहरातील प्रदूषणात भर घालणारे ठरत आहेत. याशिवाय लवकरच शहरातील प्रचारात सर्वच पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील उतरतील. त्यांच्या स्वागतासाठीही फटाक्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेत आणखी प्रदूषणाची भर पडण्याची भीती आहे.

पर्यावरण विभाग कारवाईबाबत उदासीन
शहरातील प्रदूषण जेव्हा वाढते, तेव्हा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लॅंट, बांधकामाच्या साईट्स यांवर महापालिकेकडून निर्बंध आणले जातात. तसेच दिवाळीदरम्यान काही ठराविक भागांमध्ये व ठराविक वेळात फटाके उडविण्यावरही बंदी आणली गेली. सध्या शहरातील हवेची गुणवत्ता २०० च्या घरात असल्याने हवामान खराब गटात मोडते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी असलेले वेळेचे बंधन नेतेमंडळी पाळणार का? हा कळीचा मुद्दा आहे. दुसरीकडे पर्यावरण विभागाने ‘‘फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत’’ असे सांगत हात वर केले आहेत.

नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
खराब रस्ते, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, नियम न पाळणारे आरएमसी प्लॅंट, अवजड वाहनांची वाहतूक व वाढलेली वाहनसंख्या यामुळे शहरातील वाकड, पुनावळे, ताथवडे या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. येथील ‘एक्यूआय’ म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हा डिसेंबरमध्ये ३०० च्या पुढे गेलेला आहे. येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे.

‘ज्या आस्थापनांमुळे, आरएमसी प्लॅंटमुळे प्रदूषण होते. त्या आस्थापनांवर सध्या निर्बंध घालणे सुरू आहे. त्यासाठी आमचे पथक कार्यरत आहे. फटाके उडवून प्रदूषण करू नये याचे आवाहन आम्ही दिवाळीच्या वेळीच केले होते. मात्र, फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे पोलिसांकडे आहेत.
- संजय कुलकर्णी, सह अभियंता, पर्यावरण विभाग

शहरातील हवेची गुणवत्ता
२६ डिसेंबर : २४३
२७ डिसेंबर : २२२
२८ डिसेंबर : २१९
२९ डिसेंबर : २३४
३० डिसेंबर : २३४
३१ डिसेंबर : १३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com