ई-वाहनांसह सांडपाण्याचा पुनर्वापर वाढला ई-वाहनांसह सांडपाण्याचा पुनर्वापर वाढला
पिंपरी, ता. ५ ः शहरात २०२३-२४ या वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत तब्बल ३६ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ई-वाहनांचे प्रमाण ३.५ टक्के आहे.
एकूण ई-वाहनांची संख्या ५० हजार ९०२ झाली आहे. याशिवाय रस्ते धुणे, धूळ नियंत्रण आणि उद्यानांसाठी प्रक्रिया केलेल्या ३१ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा दरमहा पुनर्वापर होत आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद आहे.
शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा सखोल मागोवा घेणारा ‘पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल ः २०२४-२५’चे प्रकाशन मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. त्यात तीन वर्षांचा तुलनात्मक आढावा आहे. शहराचे क्षेत्र, लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यःस्थिती, जलनिस्सारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवा व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मातीची गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, उर्जा वापर, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नुतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश आहे.
मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, सोहन निकम, चीफ केमिस्ट उमा भोगे, कनिष्ठ अभियंता प्रतीक सूर्यवंशी यांनी अहवालासाठी परिश्रम घेतले.
---
‘सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी’
शहराने जलनिस्सारण व्यवस्थापनात १०० टक्के निकष पूर्ण करीत सलग दुसऱ्यांदा ‘वॉटर प्लस’ मानांकन प्राप्त केले. यामध्ये घरांतील घनकचरा व्यवस्थापनातून सुक्या कचऱ्यापासून उभारलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, राडारोड्यावर प्रक्रिया करणारा सीअँडडी प्रकल्प, एमआरएफ युनिट्स, ओला-सुका कचरा ट्रान्स्फर स्टेशन, मोशीतील बायो मेडिकल वेस्ट प्लांट, कंपोस्टिंग युनिट्स, पुनर्वापर प्रकल्प, बायोगॅस युनिट्स आणि विकेंद्रित प्रक्रिया केंद्रे विशेष महत्त्वाची ठरली आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यवाही झाल्यामुळे शहराने सात-स्टार गार्बेज फ्री सिटीचे मानांकनही यशस्वीरित्या राखले आहे.
अहवालातील प्रमुख निष्कर्ष (२०२४-२५)
- महापालिकेच्या माध्यमातून १,७३,५७६ वृक्षारोपण
- भोसरीत सर्वाधिक २१८ व चिंचवडमध्ये १९७.५ मिलीमीटर पावसाची नोंद
- जून ते सप्टेंबर हवा गुणवत्ता निर्देशांक चांगला, एप्रिल, मे, ऑक्टोबरमध्ये समाधानकारक, नोव्हेंबर ते मार्च मध्यम
- पीएमपीच्या ताफ्यात १,९४८ बस; जून २०२५ अखेर सीएनजी बस संख्या २२५ व इ-बस संख्या ४९०
- १९ मैलाशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ३३२ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया
कचऱ्यावर प्रक्रिया
- आतापर्यंत ३,५१,५४२.४३ मेट्रीक टन घरगुती कचऱ्यावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात प्रक्रिया
- घरगुती कचऱ्यापासून १३,६,९४०,८५९ युनिट्स वीजनिर्मिती
- बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पात ३९,८२७ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया
- हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्पामध्ये ३,५९३ मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
- हॉटेल वेस्टपासून १,१२,२४९ किलोग्रॅम बायोगॅस निर्मिती
---
पिंपरी-चिंचवड शहराचा पर्यावरणीय विकास हे केवळ यंत्रणांचे यश नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून मिळालेले यश आहे. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल हे शहराच्या पर्यावरणविषयक प्रगतीचा आरसाच आहे. भविष्यातील निर्णयांसाठी मार्गदर्शक म्हणून हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरू शकेल.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.