आयटीतील नोकरी गेलेल्या प्रौढाकडून लुटण्याचा प्रयत्न
पिंपरी, ता. ५ : पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या प्रौढाने हँडगनच्या धाकाने ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघा भावांनी धाडसाने प्रतिकार करून त्याला पकडले. पिंपळे गुरवमधील कल्पतरू इस्टेट सोसायटीतील फेज तीनमध्ये हा प्रकार घडला. प्रौढाने आयटी कंपनीतील नोकरी गेल्याने लुटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होत आहे.
सांगबोई कोम सेरटो (वय ४०, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द, मूळ रा. मणिपूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गगन सीताराम बडेजा यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गगन आयटी अभियंता आहेत. त्यांचे वडील एका बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. त्यांचे पार्सल आले असून ओळखपत्र दाखवा, असे हिंदीत सांगत आरोपी घरात शिरला. गगन यांनी त्याला हटकले, मात्र त्याने बॅगेतून हँडगन काढून त्यांच्या कपाळाला लावली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणावेत असे त्याने दरडावून सांगितले. हॉलमध्ये मोठा आवाज येताच गगन यांचे बंधू मधुर आतील खोलीतून बाहेर आले. आरोपीने त्यांच्या दिशेने हँडगन रोखली. त्यानंतर तिघांमध्ये झटापट झाली. प्रतिकार होताच आरोपीने कंबरेला लावलेली कुकरी काढली. त्याने मधुर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र गगन यांनी पाठीमागून त्याला पकडले.
याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.
----------------
नोकरी गेल्याने हप्त्यांसाठी...
सांगबोई उच्चशिक्षित असून पत्नी व मुलांसह तो कोंढव्यात राहतो. आधी तो पुण्यात आयटी कंपनीत होता. त्याला दरमहा एक लाख ३० हजार रुपये पगार होता, वर्षभरापूर्वी त्याची नोकरी गेली. चांगल्या पगाराची नोकरी असल्याने त्याने सदनिका घेतली होती. त्याला गृहकर्जाचे हप्ते भरावे लागत होते. त्यामुळेच त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे उघड होत आहे.
------------------
हँडगन, १९ काडतुसे, कुकरी जप्त
आरोपीकडून पोलिसांनी एक हँडगन, १९ काडतुसे आणि कुकरी जप्त केली. हातबॉम्ब सारखे इलेक्ट्रिक वायर लावलेले प्लास्टिकच्या पाइपचे काही तुकडेही जप्त करण्यात आले. आरोपीकडे हँडगनचा मणिपूरमधील परवाना आहे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.