शंभर टक्के वाढीनंतरही महाराष्ट्र दुसरा

शंभर टक्के वाढीनंतरही महाराष्ट्र दुसरा

Published on

अश्‍विनी पवार
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ ः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर निर्यातीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्यात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षांत शंभर टक्के वाढ केली. यानंतरही देशात कर्नाटकचा अव्वल क्रमांक कायम आहे. तेलंगणला मागे टाकून दुसरा क्रमांक हाच काय तो महाराष्ट्राला दिलासा ठरला.
२०१९ ते २०२४ दरम्यान इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पन्नवाढ कमीच ठरल्याचे एसआयटीपी अर्थात सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. या कालावधीत कर्नाटकने सातत्याने आघाडी राखली.

राज्यातील स्थिती

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आयटी क्षेत्रातील उलाढाल हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नईपेक्षाही कमी आहे. मुंबईपेक्षा पुण्याचे उत्पन्न अधिक असले तरी सर्वाधिक उत्पन्न जिथून मिळते त्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कंपन्या आपली कार्यालये थाटण्यास उदासीन आहेत. ही स्थिती केवळ हिंजवडीतच नाही तर पुण्यात आणि राज्यातही दिसते. दुसरीकडे आयटीतील आर्थिक उलाढाल, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असूनही इतर राज्यांतील प्रगतीचा वेग जास्त आहे. कर्नाटकची उत्पन्नवाढ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. २०१९ ते २०२४ दरम्यान कर्नाटकचे उत्पन्न दुपटीने वाढले. त्यामुळे महाराष्ट्राच्या पिछाडीच्या कारणांचा शोध घेणे आवश्‍यक असल्याचे आयटी संघटनांचे मत आहे.
---
सॉफ्टवेअर निर्यातीमधील उत्पन्नवाढ
(कालावधी २०१९ ते २०२४)
कर्नाटक ः ११०.५६ टक्के
महाराष्ट्र ः १०० टक्के
तेलंगण ः ८७.७० टक्के
---
२०२३ - २०२४ मधील आकडेवारी (कोटी रुपयांमध्ये)
बंगळूर ः ४,०७,०८८.७२
हैदराबाद ः १,२१,११५.५७
पुणे ः १,०५,८१८.९८
चेन्नई ः ७७,४२१.४४
मुंबई ः ७६,५६४.५५
गुरुग्राम ः ५२,९३१.७०
नोएडा ः ५०,११९.१०
(सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडियाची आकडेवारी)
---
पाच वर्षांतील उत्पन्न

२०१९-२० २०२०-२१ २०२०-२२ २०२२-२३ २०२३-२४
कर्नाटक ः १,९४,४७३.३८ २,१२,०८५ २,५८,२४०.१४ ३,५५,१६९.१७ ४,०९,०९५.०४
महाराष्ट्र ः ९१,५१३.९ १,०१,५८१.४ १,२५,६८४.४७ १,६५,७०१.५२ १,८३,८४७.५२
तेलंगण ः ६४,५२५.९ ७१,५७४.१९ ८९.८४६.६७ १,१९,८८६.४७ १,२१,११६.६२
---

कारणे काय ?

- धोरणात्मक नेतृत्वाचा अभाव
- राजकीय अस्थिरता व इच्छाशक्तीचा अभाव
- आयटी क्षेत्रासाठी आयटी मंत्रालय नाही
- आयटी धोरण लागू होण्यास झालेला उशीर
- आयआयटी, एनआयटी, आयआयएस सारख्या संस्थांची कमतरता
- पुणे, हिंजवडी सारख्या ठिकाणी असलेला पायाभूत सुविधांचा अभाव

---

एकंदरीतच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आयटी क्षेत्रातील प्रगतीचा वेग कमी आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान हा दर आणखी मंदावल्याचे चित्र आहे. आयटी धोरण मंजूर होण्यास लागलेला उशीर हे सुद्धा याचे कारण आहे. आपल्याला कर्नाटकसारख्या राज्याच्या पुढे जायचे असेल तर सध्याची परिस्थितीला का निर्माण झाली या कारणांचा शोध घेऊन तातडीने योग्य कार्यवाही व्हायला हवी. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही आयटी धोरणांची योग्य अंमलबजावणी केली पाहिजे.

- ज्ञानेंद्र हुलसूरे, अध्यक्ष, हिंजवडी एम्प्लॉईज अॅण्ड रेसिडेंट ट्रस्ट

-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com