चऱ्होली परिसरात वन विभागाची गस्त चालू

चऱ्होली परिसरात वन विभागाची गस्त चालू

Published on

चऱ्होली, ता. ७ ः चऱ्होली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने अनेक नागरिकांनी लहान मुलांना शाळेत पाठविणे थांबविले आहे. वन विभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. मात्र, ट्रॅप कॅमेऱ्यांत अजून त्याची कोणतीही हालचाल चित्रित झालेली नाही. त्यामुळे बिबट्या एक आहे किंवा अधिक याबद्दल अद्याप वन विभागाला ठोस काही समजू शकलेले नाही. परंतु, खबरदारी म्हणून वन विभागाने गस्त चालू केली असून काही ठिकाणी पिंजरे लावण्याचीही तयारी सुरू केली आहे.
मागील काही दिवसांपासून चऱ्होली परिसरातील अनेक वस्ती आणि शेतजमिनींमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः बुर्डे वस्ती, मुक्ताई कार्यालय, काळे पेट्रोल पंप परिसर, काटे वस्ती व दाभाडे वस्ती येथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दाभाडे वस्ती व काटे वस्ती येथील शेतामध्ये गुरुवारी (ता.६) आवळ्याच्या झाडावर बिबट्या बसलेला आढळून आला. काही स्थानिकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.

मुलांच्या सुरक्षेची चिंता
या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड चिंता वाढली असून अनेकांनी आपली मुले शाळेत पाठवणे थांबवले आहे. तर काहीजण सकाळ व सायंकाळच्यावेळेस मुले रस्त्याने एकटी जाणार नाहीत, यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींना त्यांच्यासोबत पाठविण्याची खबरदारी घेत आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून त्याने शिक्षक आणि शाळा प्रशासनही चिंतेत आहेत.

नागरिकांच्या मागण्या...
- बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी दिवस-रात्र गस्त वाढवा
- बिबट्याला पकडण्यासाठी जास्त सापळे लावावेत
- ट्रॅप कॅमेरे बसवावेत
- वन विभागाने तात्पुरते पथक नेमावेत


स्थानिक प्रशासनाचे आवाहन
- नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, शक्यतो एकट्याने प्रवास टाळावा
- बिबट्या दिसल्यास तातडीने १९२६ किंवा वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

बिबट्या भर वस्तीमध्ये फिरताना दिसत आहे. मुले शाळेत जाताना एकटी असतील; तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने त्वरित पावले उचलली पाहिजेत.
- ममता काटे, स्थानिक रहिवासी

चऱ्होली परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर लगेच आमच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी पिंजरे लावण्यात येत आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या दिसल्यास तत्काळ आमच्या विभागाशी संपर्क साधावा. आम्ही २४ तास तत्पर आहोत. वन विभागाकडून पुढील काही दिवस नियमित गस्त, सापळे लावणे, स्थानिकांशी समन्वय आणि प्रबोधन मोहीम राबविण्यात येईल.
- सुरेश वरक, रेंज फोरेस्ट ऑफिसर, पुणे


आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व परिसराची पाहणी केली. एका शेतात जमिनीत बिबट्याचे ताजे ठसे स्पष्टपणे दिसून आले. त्यावरून अंदाज येतो की बिबट्या नुकताच त्या भागातून गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. झाडांची दाटी आणि शेतामधील काटेरी झुडपे यामुळे बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे आम्ही त्या भागात गस्त वाढवली असून लवकरच पिंजरे लावले जातील.
- अशोक गायकवाड, वनरक्षक

PNE25V37989

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com